कोरबा – कटघोरा परिसरात तुमान गावात झालेल्या २१ वर्षीय युवतीच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. कालपर्यंत जी हत्या ऑनर किलिंग वाटत होती त्यात पोलिसांच्या तपासानंतर युवतीचा खून तिच्याच प्रियकरानं केल्याचं उघड झालं आहे. प्रेयसी धोका देत असल्याच्या रागातून प्रियकरानेच तिचा काटा काढला. पोलिसांनी आरोपी प्रियकराची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हा गुन्हा कबूल केला आहे.
या हत्येचा तपास करताना पोलिसांना जे पुरावे सापडले ते एका हिंदी सिनेमाच्या क्राईमस्टोरीसारखे आहेत. याबाबत पोलीस अधिकारी रामगोपाल करियारे यांनी सांगितले की, आरोग्य कर्मचारी दिगपाल दास गोस्वामी यांच्या मोठ्या मुलीचं कृष्णा कुमारी गोस्वामीचं तुमानच्या संजय चौहानसोबत गेल्या ८ वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते. या मुलीची मैत्री संजयशिवाय अन्य मुलांसोबतही होती. ज्यात कटघोरा गावातील नेमेंद्र देवांगन याचाही समावेश होता. ज्याच्यासोबत युवती मोबाईलवर बोलत होती, चॅटिंग सुरू होती. ज्याची भनक कृष्णाचा प्रियकर संजयला झाली. यावरून संजय कृष्णावर नाराज झाला होता. त्याने प्रेयसी कृष्णाला नेमेंद्र आणि अन्य मुलांसोबत बोलू नये असं सांगितले. परंतु प्रेयसीनं संजयचं न ऐकताच त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचं ठरवलं.
प्रेयसीच्या मोबाईलवर केला मेसेज
घटनेच्या रात्री प्रियकर संजय चौहान प्रेयसी कृष्णाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तेव्हा त्याने युवतीला सुनावलं की, तू माझा विश्वासघात करतेय, दुसऱ्या मुलासोबत संबंध बनवतेय, इतरांशी बोलणं बंद कर, माझ्यासोबत येऊन लग्न कर नाहीतर तुला मारून टाकेन असं प्रियकर म्हणाला. त्यानंतर रात्री दीडच्या दरम्यान युवकाने तिच्या मोबाईलवरून स्वत:च्या मोबाईलवर मेसेज केला अन् लिहिलं की, मला वाचव, माझे वडील मला मारून टाकतील. त्यानंतर प्रियकरानं युवतीच्या घरातच साडीने तिचा गळा दाबून मारून टाकलं. घटनेच्यावेळी घरातील इतर सदस्य झोपले होते. सकाळी वडील दिगपाल यांना घराच्या मागच्या बाजूस मुलगी मृत अवस्थेत आढळली. गळ्याभोवती साडी होती. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.
लग्नाच्या गोष्टीवरून वडिलांसोबत होता वाद, प्रियकरानं फायदा घेण्याचा प्रयत्न
तपासात समोर आलं की, वडील दिगपाल दास गोस्वामी त्यांच्या मुलीचं लग्न सूरजपूरमध्ये ठरवलं होतं. परंतु या लग्नाला मुलीचा नकार होता. ज्यामुळे वडील-मुलीमध्ये वारंवार वाद होत होते. त्याची माहिती प्रियकर संजयला होती. त्याने याचाच फायदा घेत प्रेयसीच्या वडिलांविरोधात स्वत:च्या मोबाईलवर मेसेज केला त्यामुळे संशयाची सुई वडिलांवर जाईल.
वडिलांनाच खूनी बनवलं
हत्येच्या तपासात पोलिसांनी वडिलांनाच खूनी बनवलं. मुलीच्या मोबाईलवर मेसेज गेला होता त्यात मला वाचव, माझे वडील मारून टाकतील असं लिहिलं होतं. दिगपाल यांनी सकाळी मुलीच्या गळ्याभोवती असलेला साडीचा फास काढणे ज्यामुळे त्यांच्या हाताचे ठसे साडीवर सापडले. त्यामुळे पोलिसांनी वडील, भाऊ आणि अन्य दोघांची चौकशी केली ज्यात हे ऑनर किलिंग प्रकरण असल्याचं वाटलं
असा झाला हत्येचा उलगडा
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संजय त्याचा मोबाईल कधी बंद करत नव्हता आणि जेव्हा तो कृष्णाच्या घरी जातो तेव्हा मोबाईल घेऊन जात होता. परंतु घटनेच्या दिवशी त्याचा मोबाईल बंद होता आणि तो मोबाईल घेऊन गेला नाही. कृष्णाच्या मोबाईलवरून त्याने स्वत:ला मेसेज केला कारण हत्येचा संशय वडिलांवर येईल आणि तो पोलिसांच्या तावडीतून सुटेल. मात्र पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा कबूल केला.