मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. आज कोरोनाची रुग्णसंख्या 18 हजारांवर आली आहे. मात्र पहिल्या लाटेतील ही संख्या सर्वोच्च होती. ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे गरजेचं आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
कोरोनाच्या परिस्थितीत आता फरक दिसत आहे परंतु म्हणावे तितके आकडे खाली आले नाहीत. रुग्णसंख्या कमी होत चालली असली तरी गेल्या वेळच्या सर्वोच्च संख्येच्या जवळ आपण आता आलो आहोत. दुसर्या लाटेतला विषाणू झपाट्यानं पसरतोय. त्यामुळे कडक लॉकडाऊन नाही परंतु निर्बंध कायम राहणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव अजूनही वाढत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अन्न सुरक्षा योजनेत सरकारने आतापर्यंत 2 लाख 74 हजार मेट्रिक टन धान्याचे मोफत वाटप केलं आहे. शिवभोजन योनजेअंतर्गत एकूण 54 ते 55 लाख थाळ्यांचे मोफत वितरण केलं आहे. संजय गांधी निराधार, दिव्यांग निवृत्ती, विधवा निवृत्ती वेतनमध्ये 850 कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. बांधकाम कामगारांना 155 कोटी रुपयांची मदत केली आहे. फेरीवाल्यांसाठी साधारण 52 कोटींची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.