महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउन वाढवणार असून निर्बंध थोड्या प्रमाणात शिथील केली जातील असं सांगितलं होतं. मुख्यमंत्री यासंबंधी अधिकृत माहिती देतील असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेसोबत संवाद साधणार असून यावेळी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळं या लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काही निर्णय घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात काल (29 मे) 20 हजार 295 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, तर 443 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर हा 1.65 टक्के एवढा आहे. राज्यात सद्यस्थितीत 2 लाख 76 हजार 573 सक्रिय रुग्ण असून, त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57 लाख 13 हजार 215 झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान राज्यात घातलेले असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत चालली होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने केलेल्या प्रयत्नांनाही यश येताना पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात राज्यात 20 हजार 295 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना संक्रमणाचे प्रमाण हळूहळू कमी झाल्याचे चित्र आकडेवारी सांगत आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकार लॉकडाऊन वाढविणार असले, असे सांगण्यात येत असले तरी, काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.