राज्यात १५ ते २० मे या कालावधीत तोउक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरे आणि अन्य बांधकामांची झालेली पडझड आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
बांधकांमांची दुरुस्ती व मजबुतीकरण ही कामे थांबू नयेत यासाठी बांधकाम आणि बांधमांशी संबधित दुकाने अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केली आहेत. या दुकानांना निर्बंधांमधून मुभा देण्यात आली असून नियमानुसार ही दुकाने सुरू राहणार आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने १३ एप्रिलपासून राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. यात अत्यवश्यक सेवेतील दुकाने केवळ उघडता येणार होती. मात्र, राज्यात आलेले तोउक्ते वादळ आणि त्यामुळे घरांची आणि अन्य बांधकामांची पडझड याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. तसेच अनेक ठिकाणची बांधकामेही रखडली होती.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधकामाशी संबंधित दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच छत्र्या, प्लास्टिकच्या शिट्स, ताडपत्री, पावसाळी पोशाख इत्यादी बाबींची विक्री व दुरुस्ती करणारी दुकाने व व्यवसाय सुरू ठेवता येतील.
तसेच कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील अशा साहित्यांची दुकाने व व्यवसाय सुरू राहू शकणार आहेत. अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी ज्या वेळा देण्यात आल्या आहेत त्याच वेळेत ही दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आवश्यक वाटल्यास ही दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून देऊ शकतात. ही दुकाने सुरू ठेवताना सर्व कोरोनाशी संबधित सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. नियमांचे उल्लंघन केल्यास १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.