तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) ग्राहकांच्या खिशाला 1 जुलैपासून कात्री लागणार आहे. SBI बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेदारांसाठी नवे चार्जेस 1 जुलै 2021 पासून लागू होणार आहेत. बँकेने एटीएममधून पैसे काढणं, चेकबुक, मनी ट्रांसफर आणि नॉन फाइनेंशियल ट्रांझेक्शनवर सर्व्हिस चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर (website) माहिती दिली आहे.
SBI ब्रांचमधून पैसे काढण्यासाठी लागणारे चार्ज –
लाईव्ह हिंदुस्तानने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी एका महिन्यात 4 पेक्षा जास्त वेळा एसबीआयच्या शाखेतून अथवा एटीएममधून पैसे काढल्यास त्यासाठी 15 रुपये आणि जीएसटीची रक्कम आकारली जाईल. प्रत्येक ट्रांझेक्शनसाठी तुम्हाला इतका चार्ज द्यावा लागेल. हा नियम एसबीआय एटीएम आणि इतर बँकांच्या एटीएमसाठी लागू होईल.
चेकबुकसाठीही द्यावे लागणार पैसे –
स्टेट बँक ऑफ इंडिया बीएसबीडी खातेदारांकडून चेकबुकसाठी पैसे घेत नाही. मात्र, 10 चेक झाल्यानंतर 40 रुपये आणि जीएसटी आकारले जाते. तर, 25 चेक असणाऱ्या चेकबुकसाठी 75 रुपये आकारले जातील. याशिवाय इमर्जन्सी चेकबुकसाठी 50 रुपये आणि जीएसटी चार्ज द्यावा लागेल. या नियमांमधून ज्येष्ठ नागरिकांना सूट देण्यात आली आहे.
SBI आणि BSBD अकाउंट म्हणजे काय?
BSBD म्हणजे झीरो बॅलन्स अकाउंट. या बचत खात्यात बऱ्याच सुविधा बँकेकडून दिल्या जातात. या खात्यात ग्राहकांना एसबीआयच्या सेव्हिंग अकाउंटप्रमाणेच व्याज मिळतं. हे व्याज ज्यांचं फक्त सेव्हिंग अकाउंट आहे, अशा ग्राहकांना मिळत नाही. याशिवाय या खात्यात कमीत कमी रक्कम ठेवण्याचीही सूट ग्राहकांना आहे. तसंच फ्री एटीएम आणि डेबिट कार्डसह जास्तीत जास्त रक्कम ठेवण्यासाठी कोणत्याही ठराविक रकमेचं बंधन नाही.
BSBD अकाउंट कोण उघडू शकतं?
एसबीआय-बीएसबीडी अकाउंटला एसबीआय नेट बँकिंग (SBI Net Banking)अथवा एसबीआय ऑनलाइन सेवांच्या माध्यमातून केवायसी गरजा पूर्ण करून उघडलं जाऊ शकतं. ज्या कोणाजवळ वैध केवायसी कागदपत्रे असतील, तर ते ते अकाउंट उघडू शकतात. हे खातं एकट्याचं, जॉईंट किंवा वारसदाराचं नाव टाकून उघडलं जाऊ शकतं. भारतीय स्टेट बँकच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सद्य स्थितीत बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाऊंटवर वार्षिक व्याज 2.75 टक्के दिलं जातंय.