१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण नोंदणी ‘ऑन साईट’ किंवा ‘वॉक इन’ पद्धतीने होणार आहे. याबाबतची माहिती आज केंद्र सरकारने दिली. १८ ते ४४ वयोगटातील काही लाभार्थ्यांचे लसीकरण राज्य सरकारने सुरु केलेल्या कोरोना लसीकरण केंद्रांवर होणार आहे. हे लसीकरण लसींचे वेस्टेज कमी करण्यासाठी करण्यात येणार आहे. याबाबतचे नोटिफिकेशन आज प्रसिद्ध करण्यात आले. त्यामध्ये जर ऑनलाईन नोंदणी केलेले कोणी लसीकरणाला आले नाही तर काही डोस वापरण्यात यावे असे म्हटले आहे.
केंद्राने लसीकरण केंद्रावर ऑन – साईट नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे. ज्यांच्याकडे इंटरनेट किंवा स्मार्ट फोन, मोबईल फोन उपलब्ध नाही त्यांच्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. पण, ऑन साईट नोंदणी ही राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे सांगितले. केंद्राने ऑन साईट नोंदणीचा निर्णय हा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी घ्यावा. ही सुविधा फक्त सरकारी लसीकरण केंद्रापुरतीच मर्यादीत असावी. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांना अशी परवानगी देण्यात येऊ नये असे सांगितले आहे.
केंद्र सरकारवर देशातील लसीकरण मोहिम योग्य प्रकारे हाताळता आलेली नाही अशी टीका होत आहे. त्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतला आहे. लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक राज्य सरकारांना त्यांची लसीकरण केंद्रे बंद करावी लागली आहेत.
दिल्लीने शनिवारी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण लसींचा पुरवठा होत नसल्याने बंद करत असल्याचे जाहीर केले होते. याचबरोबर पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांनीही आपले १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण यापूर्वीच स्थगित केले आहे.
लसींच्या तुटवड्यावर मार्ग शोधण्यासाठी अनेक राज्यांनी विदेशी लस उत्पादक कंपन्यांकडून थेट लस आयात करण्याचा प्रयत्न केला. पण, फायझर आणि मॉडर्ना यासारख्या मोठ्या लस उत्पादक कंपन्यांनी आम्ही फक्त केंद्र सरकारशी व्यवहार करणार असे सांगितले. त्यामुळे थेट लस आयात करण्याच्या मार्गावरही अडथळे निर्माण झाले आहेत.