मुंबई: ‘आता आपल्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. पण त्यामुळेच रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या.’ असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. ( Chief Minister Uddhav Thackerays Dialogue With Doctors )
कोरोनाच्या तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरु शकते अशावेळी राज्य सरकारने आतापासूनच या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी त्यांनी आज बाल रोगविषयक टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व डॉक्टरांशी संवाद साधताना काही महत्त्वाच्या गोष्टी देखील स्पष्ट केल्या.
‘लहान मुलांच्याबाबतीत तर आपला डॉक्टरवर अगदी अंधविश्वास असतो, म्हणून..’
‘गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. त्यामुळे डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. पण त्यामुळेच रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे, योग्य मार्गदर्शन करावे.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
‘पालकांनी घाबरुन जाऊ नये’
‘मी पुन्हा एकदा सांगतो की, अजिबात घाबरु नका. घाबरण्याचं कारण नाही. समजा कोरोनाची तिसरी लाट आलीच. येऊ नये ही मनापासून प्रार्थना आहे. पण समजा जर तिसरी लाट आली आणि लहान मुलांना त्याचा संसर्ग होऊ लागला तर काय करावं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच काय करु नये हे देखील महत्त्वाचं आहे. अनाठायी, अनावश्यक औषधं देऊ नये.’
‘खासकरुन आपल्या मुलांना काही होऊ नये यासाठी जे पालक आपला हा कार्यक्रम पाहत असतील त्यांना आपण आश्वस्थ केलं पाहिजे की, घाबरु नका आम्ही आहोत. काही चिंता करु नका. फक्त वेळेत मुलांना डॉक्टरकडे घेऊन जा.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना लागण होण्याची भीती’
‘हा विषय संवेदनशील आहे. आता आपण दुसऱ्या लाटेचा सामना करतो आहोत. आता अंदाज व्यक्त केला जात आहे की, तिसरी लाट येऊ शकते आणि वयाचा विचार केल्यास आपल्याला समजेल की, पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना जास्त लागण झाली, दुसऱ्या लाट जिचा आता आपण सामना करत आहोत त्यामध्ये युवा आणि मध्यमवयीन लोकांना लागण झाली आहे. आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही शक्यता वर्तवल्यानंतर आपण शांत बसणं हे काही शक्य नाही.’ असंही सीएम म्हणाले.
‘आता यानिमित्ताने काही प्रश्न निर्माण होत आहेत ते म्हणजे लहान मुलांना मास्किंग कसं करायचं, वावरायचं कसं याबाबत देखील आपण तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन करा. मी अजूनही तेच म्हणतोय की, अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. तिसरी लाट येऊ नये हा आपला प्रयत्न आहे. मात्र, त्यासाठी आपली तयारी देखील सुरु आहे.’
दरम्यान, देशातील तज्ज्ञ डॉक्टरांनी असा अंदाज वर्तवला आहे की, कोरोनाची तिसरी लाट ही येत्या सहा ते आठ महिन्यांमध्ये येऊ शकते. यावेळी या लाटेत लहान मुलांना अधिक लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील संकटाची चाहूल लक्षात येताच आता राज्य सरकारने त्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.