अकोला: महान धरणाच्या पायथ्याशी असलेल्या महानगर पालिकेच्या ६०० व्यासाच्या जलवाहिनीला मूर्तिजापूर व खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत महान ते उन्नई बांध्याऱ्यापर्यंतच्या ६०० व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी केली जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत हे काम दोन दिवसाच्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी संपूर्ण अकोला शहराचा पाणीपुरवठा २४ व २५ मे रोजी बंद ठेवावा लागणार आहे. मजीप्राच्या या कामाला मनपा प्रशासनाने मंजुरी दिली असून, अकोलेकरांना दोन दिवस विलंबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती मनपा जलप्रदाय विभागकडून प्राप्त झाली आहे. ( The water supply in Akola will be closed for two days)
‘अमृत’ अभियानांतर्गत महान धरण ते अकोला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे टाकणे, शहरात जलवाहिनीचे जाळे बदलणे व नवीन आठ जलकुंभ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. जलवाहिनीचे नवीन जाळे टाकण्यात आल्याने पाण्याचा अपव्यय कमी होईल, असा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, मूर्तिजापूर व खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत महान धरणातून उन्नई बंधाऱ्यापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिनीचे जाळे टाकल्यास पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा अपव्यय टाळता येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा पाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी महान धरण ते उन्नई बंधाऱ्यापर्यंत ६०० व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. यासाठी महान धरणाच्या पायथ्याशी असलेल्या मनपाच्या ६०० व्यासाच्या जलवाहिनीला जोडणी करावी लागणार आहे. या कामाकरिता किमान दोन दिवसाचा अवधी लागणार आहे.
दोन दिवस (२४ व २५ मे रोजी) पाणीपुरवठा होवू शकणार नाही. यासाठी नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून त्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मनपा जलप्रदाय विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी शहरवासीयांना केले आहे.