मुंबई : राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर कधीही उठवला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कोकण दौर्यात सांगितल्याने कोरोनाच्या कोंडवाड्यात बंद पडलेल्या महाराष्ट्राच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत अवघ्या दीड महिन्यात तिसर्या लॉकडाऊनमधून महाराष्ट्र जात आहे. सलग लादले जाणारे लॉकडाऊन कधी थांबतील आणि बाजारपेठ पूर्ववत केव्हा सुरू होईल याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला आहे. गेल्या 15 मेपासून जाहीर केलेला दुसर्या लाटेतील तिसरा लॉकडाऊन 31 मे रोजी संपेल. काटेकोर सांगायचे तर 1 जून रोजी सकाळी 8 वाजता हा लॉकडाऊन उठवला जाणे अपेक्षित आहे.
तौक्ते चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या दौर्यावर होते. या दौर्यात माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी लॉकडाऊनचा मुद्दा छेडला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, 1 जूननंतर राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून हा लॉकडाऊन कधीही उठवला जाऊ शकतो. मात्र त्यानंतरही सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. सध्या परिस्थिती आटोक्यात असून, परिस्थितीनुसार लॉकडाऊनबद्दल निर्णय घेऊ.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना कमी होत आहे. मात्र, त्याबद्दल इतक्यात काही बोलणार नाही. पहिल्या लाटेत आपण हा अनुभव घेतला. त्यावेळी आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोरोना चौपट वाढला. सध्याचा कोरोना विषाणू फार घातक आहे. तो अत्यंत वेगाने पसरतो. याकडेही लक्ष वेधून मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या वेळच्या तुलनेत कोरोनाची आजची स्थिती वाईट आहे. त्यामुळे जेव्हा आपण निर्बंध शिथिल करू तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे व्हावे लागेल. सध्या 70 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही कोरोना रुग्णांसाठी बेड कमी पडत आहेत. ही टक्केवारी वाढली तर काय होईल याचा विचार करा, असा इशाराही उद्धव यांनी दिला.
रुग्णसंख्येवर निर्णय अवलंबून
लॉकडाऊन उठवण्यासाठी कोरोनाची रुग्णसंख्या हीच पूर्वअट असल्याने कोरोनाचा ग्राफ किती खाली येतो यावर लॉकडाऊन कमी अधिक तीव्र ठेवणे अवलंबून असेल. मंत्रालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी नोंदवली गेली अशी शहरे लॉकडाऊनमुक्त होऊ शकतात. ज्या शहरांमध्ये अजूनही कोरोनाचा जोर कायम आहे तिथे मात्र एक तर आहे तो लॉकडाऊन कायम राहील किंवा गर्दी रोखणारे निर्बंध लागू करून बाजारपेठा मर्यादित स्वरूपात खुल्या केल्या जाऊ शकतात.
अंशत: लॉकडाऊन सुरू राहील?
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात अत्यंत सूचक वक्तव्य केले. तिसरा लॉकडाऊन केल्यानंतर राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णवाढ कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवताना याचाही विचार करावा लागेल, असे थोरात म्हणाले. याचा अर्थ 1 जूननंतर सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही. अंशतः लॉकडाऊन कायम राहू शकतो. अर्थात या अंशतः लॉकडाऊनमध्ये बाजारपेठा सुरू करा, दुकाने उघडू द्या, हॉटेल्स पुन्हा चालू करा या महत्वाच्या मागण्यांचा विचार होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.