नवी दिल्ली : म्युकर मायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस हा साथीचा रोग असल्याचे केंद्र सरकारकडून आज (गुरुवार) जाहीर करण्यात आले. देशाच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून ब्लॅक फंगसचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. यापूर्वी तेलंगण आणि राजस्थान सरकारने म्युकर मायकोसिसचा समावेश साथीच्या रोगात केलेला आहे.
ब्लॅक फंगसचा समावेश साथीच्या रोगांत करावा, असे निर्देश राज्य सरकारांना देण्यात आले असल्याचे आरोग्य खात्याचे सहाय्यक सचिव लव अगरवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आगामी काळात देशभरातील सर्व सरकारी-खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांना म्युकर मायकोसिसबाबत साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये नमूद असलेल्या नियमावलींचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे. रुग्णांची तपासणी, उपचार तसेच या आजाराच्या व्यवस्थापनासाठी साथरोग नियंत्रण कायद्यातील नियमावलीचा वापर करणे गरजेचे ठरणार आहे.
म्युकर मायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. रोग प्रतिकारकशक्ती कमी झालेल्या रुग्णांना यापासून जास्त धोका आहे. नाकाद्वारे ही बुरशी शरीरात जाते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेश करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षा हा संसर्ग जास्त धोकादायक आहे. नाकातून काळसर द्रव बाहेर येणे, नाक सतत वाहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होणे व सुजणे, कमी दिसणे ही म्युकर मायकोसिसची प्रमुख लक्षणे आहेत.