अमरावती: महाराष्ट्रातली कोरोना रुग्णांची दुसरी लाट अमरावतीपासून सुरू झाली. त्यानंतर तिथे केलेल्या उपाययोजनांमुळे तिथली रुग्णसंख्या कमी झाली. मात्र आता जेव्हा देशात आणि राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय तेव्हा पुन्हा एकदा अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. पण फक्त अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचं कारण आरोग्य अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशातील रुग्णांची वाढती रुग्णसंख्या असं दिलं आहे.
आरोग्य विभागाच्या साथरोग नियंत्रण विभागातील सर्व्हेलन्स अधिकारी असलेले डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. दोन्ही बाजूकडून लोकांची होणारी ये-जा याला कारण आहे असं डॉ. आवटे सांगतात. असं असलं तरी याला कोरोनाची तिसरी लाट म्हणता येणार नाही असा महत्त्वपूर्ण खुलासा डॉक्टर आवटे यांनी केला आहे. अमरावतीमध्ये 9967 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. अमरावतीमध्ये 19 मे रोजी ग्रामिण भागात 1086 कोरोना रुग्ण आढळले आहेत तर 12 कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. तर महानगरपालिका क्षेत्रात 242 कोरोना रुग्ण झालेत आणि 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
हे पण वाचा : कोरोना चाचणीसाठी आता थुंकीचे नमुने, नागपूरच्या ‘NEERI’चं संशोधन, वेळ आणि खर्चाची बचत
अमरावतीच्या या तालुक्यांमध्ये वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या
“अमरावतीतल्या रुग्णांची संख्या ग्रामिण भागामध्ये वाढतेय. मोरशी, अचलपूर, चांदूरबाजार आणि मुरूड या जिल्ह्यांमध्ये अमरावतीतील 30 ते 40 टक्के रुग्ण आढळले आहेत. हे तालुके मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहेत,” अशी माहिती डॉ. आवटे यांनी दिली. त्याचबरोबर “राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. लॉकडाऊननंतर राज्यातील 25 टक्के रुग्ण कमी झाले. ज्यामध्ये सर्वाधिक घट ही नांदेड जिल्ह्यात झाली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 81 टक्क्यांनी घटली आहे. तर, मुंबईमध्ये 77 टक्के रुग्णसंख्या कमी झाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आणि जिल्ह्याच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉ. अनिल रोहनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय मात्र याला तिसरी लाट म्हणता येणार नाही. “फेब्रुवारी महिन्यात जेव्हा कोरोना रुग्णांची संख्या अमरावती जिल्ह्यामध्ये वाढली. त्यानंतर जिल्ह्यात लॉकडाऊन लावला आणि रुग्णसंख्या घटली. त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढली. आता ही रुग्णसंख्या जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ओसरलेली दिसेल.”
राज्यातल्या या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय
राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय” अशी माहितीही डॉ. आवटे यांनी दिली. “बुलढाणामध्ये आधी 204 रुग्ण आढळत होते. आता तिथे 1380 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सातारामध्ये 115 टक्के कोरोना रुग्णांची संख्या वाढलीय. सातारा, सांगली, सोलापूर, यवतमाळ अहमदनगर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय,” अशी माहिती डॉ. आवटे यांनी दिली.
जिल्हाधिकारी सांगतात मागच्या 10 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय
मात्र जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दहा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय. “ज्या चार ते पाच तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती तिथे आता ती कमी होते. जिल्ह्यातल्या 9 तालुक्यांमध्ये आता कोव्हिड हेल्थ सेंटर उभारण्यात आलं आहे. तसंच कोरोनाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जिथे कोव्हिड हेल्थ सेंटर आहे तिथे आता 150 खाटा वाढविण्यात येत आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. येत्या 10 दिवसात चाईल्ड पिडिअट्रीक वॉर्ड उभारण्यात येत आहे,” अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.