नागपूर : कोरोना संसर्गानंतर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या खिशातील पैसे, दागिने, मोबाईलची चोरी झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत रॅप करताना त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी केली जात असे. मृताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या दोन आरोपींना नागपुरात अटक करण्यात आली आहे. (Nagpur Corona Patient Dead body Cash Mobile Theft)
मृतदेहाला रॅप करताना चोरी
कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाच्या खिशातील पैसे, मोबाईल, सोन्याच्या अंगठ्या, दागिने, घड्याळ गहाळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. नागपूर येथील मेयो रुग्णालयात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहाला रॅप केले जात असे. हे काम करणाऱ्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मृतांच्या खिशातील पैसे, अंगावरील सोन्याचे दागिने, महागडी घड्याळे लंपास करण्याचा सपाटाच लावला होता.
मृताच्या नातेवाईकाच्या तक्रारीने बिंग फुटलं
इतकंच नाही तर रुग्णांजवळचे महागडे मोबाईल देखील हे चोरटे शिताफीने लंपास करत होते. कोरोना वॉर्डात सेवा देत असल्याने इथे कोणी आपली चौकशी करु शकणार नाही, त्यामुळे आपले बिंग फुटणार नाही, असा समज या आरोपींचा झाला होता. मात्र चोरीच्या संदर्भात एका मृतकाच्या नातेवाइकाने नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली होती.
एक लाख 19 हजारांचा ऐवज जप्त
या तक्रारीचा तपास करताना बॉडी रॅप करण्याचं कंत्राट असणाऱ्या स्पीक अँड स्पॅन कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मात्र आरोपी काहीही बोलायला तयार नव्हते. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपी गणेश डेकाटे, छत्रपाल सोनकुसरे यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळून एक लाख 19 हजार रुपये किमतीचे मोबाईल आणि मौल्यवान साहित्य देखील जप्त केले आहेत
एकीकडे कोरोना काळात चांगलं काम करत असल्याने कोरोना वॉरियर्सची स्तुती केली जाते. त्यांच्या कामाचे दाखले दिले जातात, मात्र त्यातील काही महाभाग गुन्हे करत असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.