मुंबई: चक्रीवादळ तौक्ते आज मुंबईत दाखल झाले. हवामान विभागाने सांगितल्यानुसार, या वादळाने मुंबईत येताच आपले रौद्र रुप धारण केले आहे. यादरम्यान 185 किमी/तास वेगाने वारे वाहत असून, मुसळधार पाऊसदेखील सुरू आहे. या वादळामुळे मुंबईतील लसीकरण थांबवण्यात आले आहे. मुंबईतील विमानतळदेखील 11-2 बंद राहणार आहेत. याशिवाय, हाय टाइडमुळे मुंबईतील वरळी सी लिंक बंद करण्यात आले आहे.
मुंबईसह रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाण्यातही लसीकरण बंद करण्यात आले आहे. हवामान विभागाने मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाण्यात अलर्ट जारी केला आहे.
ताक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
मुंबईमध्ये NDRF च्या तीन पथकांना तैनात करण्यात आले असून, 5 टीम अलर्टवर आहेत. 5 ठिकाणी शेल्टर होम बनवण्यात आले आहेत. शहरातील दादर, वरळी, लोअर परेळ, माटुंगा आणि माहिमसह मुंबईतील पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राइववर उंच लाटा येत आहेत.