जळगाव जा.(सुनीलकुमार धुरडे)- जळगाव जामोद तालुक्यातील वन परिक्षेत्रातील तरोडा बुद्रुक येथील शेत शिवारामध्ये काही हरिण काळवीट मृतावस्थेत पडलेली असल्याची माहिती जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळाल्यावरून आज सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे ६ काळवीट मादी व ४ नर जातीचे हरीण मृतावस्थेत आढळून आले. शेगाव, जळगाव जामोद या तालुक्यात हरिणांचा वावर असून या तालुक्यांमध्ये जंगल असल्याने प्राण्यांची संख्या जास्त आहे. यामुळे या परिसरात शिकाऱ्यांचाही वावर आहे. यामध्ये शनिवारी जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील हरणांचे मृतदेह पडून असल्याचे समजताच वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता सदर शिवारातून ६ काळवीट मादी जातीचे आणि ४ नर जातीचे हरिण मृतावस्थेत मिळून आले. सदर प्राण्यांचे शव गोळा करून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी सदर हरणांचा शवविच्छेदन करण्यात आले आहे. सदर प्राण्यांचे पोस्टमार्टम केल्यानंतर शरीराचे भाग गोळा करून सदर नमुने सीलबंद करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली..हरिणांचा मृत्यू कुठल्या कारणाने झाला याचा शोध घेतल्या जात आहे. हरिणांवर विष प्रयोग करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावेळी वनविभागाचे विविध अधिकारी व मानद वन्यजीवरक्षक मंजितभाई हजर होते.
सातपुड्याचे भकास होणेच ह्या हरणांचे जीव जाण्यास कारणीभूत- आश्विन राजपूत पर्यावरणप्रेमी
तालुक्यातील उंबरदेव ते कुवरदेव हा अतिशय महत्वाचा व करिडॉर मार्ग असलेला सातपुडा सध्या सर्वच वनगुन्ह्याना सहन करत झिजतो आहे, वृक्षतोड,अवैध चराई,गौण खनिज चोरीचे रस्ते,डिंकतस्कर, मानवनिर्मित वणवे,पाण्याचे दुर्भिक्ष्य या सर्व कारणांनी वन हद्द ओलांडून ही मुकी जनावरे पाण्याच्या शोधात शेती हद्दीत घुसतात, कुत्रे व इतर त्रासाने रस्ते भटकंती होते,
भुकेमुळे शेतीचे पीक खाल्ल्या गेल्याने शेतकरी दुष्मन बनू शकतो
ह्या सर्व समस्या चा सामना करत सदर घटनेतील हरणे ही बिचारी एखाद्या विषबाधेस बळी पडली असावी.
यापैकी दोन हरीण ह्या गरोदर होत्या, ते दोन जीव जग पाहण्याआधिच गेले.-अश्विन राजपूत
सदर घटनेने सर्व वणप्रेमी व पर्यावरणप्रेमी व संवेदनशील जनता हळहळ व्यक्त करत होती.