हिवरखेड (धीरज बजाज)- एक काळे माकड संपूर्ण गावाला किती भारी पडू शकते याची प्रचिती हजारो हिवरखेड वासियांना येत असून त्या काळ्या माकडाच्या त्रासामुळे संपूर्ण हिवरखेडवासी त्रस्त झाले आहेत
सविस्तर असे की माकड वन्यप्राणी असले तरी माकड आणि मानव यांचा संबंध फार जुना आहे. अनेक ठिकाणी माकडे माणसांमध्ये एवढे मिसळून जातात की अगदी पाळीव प्राण्यांप्रमाणेच ते माणसांमध्ये वावरतात.परंतु हिवरखेड वासियांना जवळपास मागील दोन महिन्यांपासून वेगळाच अनुभव येत असून एका काळ्या माकडाने पूर्ण गावाला त्राहिमाम् त्राहिमाम् करून सोडले आहे.
हे काळे माकड अत्यंत मोठे असून पूर्ण वाढ झालेले आहे. हे पिसाळलेल्या प्राण्याप्रमाणे अचारण करीत असून संपूर्ण गावात दहशत निर्माण करणे, नागरिकांवर प्राणघातक हमला करणे, खाद्य वस्तू हिसकाऊन नेणे, घरात घुसून महिलांना चापटा मारून मारहाण करणे, आकस्मिकपणे घरामध्ये हल्लाबोल करणे, शेतमाल आणि घरगुती वस्तूंचा नाश करून मोठ्या प्रमाणात नुकसान करणे, आतापर्यंत उड्या मारुन शेकडो मोटरसायकलींना पाडणे, लहान मुलांच्या अंगावर धावून जाणे, हे माकड सातत्याने नागरिकांवर आक्रमणाच्या तयारीत असल्याने संपूर्ण गावात भयावह वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिन्यात आरोग्यवर्धिनीतील एका परिचारिकेवर हल्ला केल्यानंतर वनविभागाची चमू सदर माकड पकडण्यास आली होती परंतु त्यांना यश मिळाले नाही.
सदर माकडावर कुणाचं जोर चालत नसल्याने त्याची हिम्मत आणखी वाढली आहे. या माकडाने नावाचा विचार न करता थेट मारोती काइंगे या वृद्धावरच हल्ला करून गंभीर जखमी केले. परिणामी मारोती काकांच्या हाताला चक्क 15 टाचे पडले असल्याची माहिती त्यांनी दिली.वन विभागाने तात्काळ उपाययोजना करून या माकडाला जेरबंद करून दूर जंगलात सोडावे आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी अशी एक मुखी मागणी भयग्रस्त नागरिक करीत आहेत.
आपला आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करून सर्व हिवरखेड वासियांनी “त्या” काळ्या माकडा पासून सावध राहून दूर राहणे आवश्यक आहे.