मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना बाधित पत्रकारांची सर्व काळजी घेणार असून त्यांच्यावर सर्व शासकीय आणि खाजगी रूग्णालयात मोफत इलाज करण्यात येणार आहेत.मध्य प्रदेश सरकारच्या या निर्णयाचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी स्वागत केले असून महाराष्ट्र सरकारने आपला हट्ट सोडून संकटकाळात पत्रकारांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी आज एक ट्विट करून पत्रकारांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे. पत्रकार विमा योजनेअंतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या योजनेचा लाभ प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मिडियातील पत्रकारांना मिळणार आहे. महाराष्ट्रात पत्रकार कोणाला म्हणायचं यावरून किस पाडला जात असताना मध्य प्रदेश सरकारने मात्र अधिस्वीकृती धारक आणि अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांना देखील योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ रिपोर्टर्सच नाही तर डेस्कवर काम करणारे पत्रकार देखील योजनेचा लाभ घेऊ शकतील.
मध्य प्रदेश सरकारने पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून यापुर्वी च जाहीर केले असल्याने त्यांना प़ाधान्याने लस दिली गेली.दिवंगत पत्रकारांची कुटुंबीयांना पाच लाख रूपये दिले गेले आणि आता मोफत इलाज देण्याची घोषणा सरकारने केली आहे.पत्रकारांबददलची सरकारची ही संवेदना स्वागतार्ह असल्याचे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रात 131 पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत. राज्यात किमान 200 पत्रकार विविध रूग्णालयात इलाज घेत आहेत. पत्रकार बाधित झाल्याने त्यांचे कुटुंबिय बाधित होण्याचे प्रमाण मोठे आहे. पत्रकारांची अनेक कुटुंबं देशोधडीला लागली असली तरी राज्य सरकार पत्रकारांच्या हिताचा एकही निर्णय घेत नाही. पत्रकारांना लस देखील मिळत नसल्याने तरूण पत्रकार मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप एस.एम.देशमुख यांनी केला आहे.सरकारने लवकर पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित केले नाही तर राज्यातील पत्रकार लवकरच निर्णायक लढा उभारतील असा इशाराही एस.एम.देशमुख यांनी दिला आहे.