मुंबई: आजपासून अरबी समुद्रात ‘तॉक्ते’ नावाच्या चक्रीवादळाच्या (Hurricane) निर्मितीला सुरूवात होणार असून किनारपट्टी परिसरातील वातावरणात झपाट्यान बदल होतं आहे. 16 मे रोजी सकाळपर्यंत अरबी समुद्रात मोठं चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. परिणामी दक्षिण भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहेत. येत्या चार दिवसांत कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर या राज्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
येत्या चार दिवसांत कर्नाटक, केरळ, तामिळनाडूसह महाराष्ट्रातही वातावरणात मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. पुढील चार दिवस राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात १६ मे ला तयार होणा-या चक्रीवादळा नुसार आयएमडीने आज, येणा-या 4 दिवसासाठी तीव्र हवामानाचे इशारे दिले आहेत. कोकणात व मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात १४ ते १५मे पासून मोठा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे;शनि/रविवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.रविवारी मुंबईतपण pic.twitter.com/DcTAwBiTwz
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 14, 2021
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
मागील काही दिवसांपासून मुंबईतील कमाल तापमान सरासरी तापमानाच्या खाली घसरलं होतं. त्यामुळे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भात सुर्यानं मुंबईकरांना काहीसा दिलासा दिला आहे. पण येत्या रविवारी (16 मे) मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत मुंबईकरांनी लांबचा प्रवास करू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. तसेच घराबाहेर पडत असाल, तर योग्य ती खबरदारी घेऊन घराबाहेर पडा.
या चक्रीवादळाला ‘तॉक्ते’ हे नाव कोणी दिलं?
हे चक्रीवादळ 2021 वर्षातील पहिलं चक्रीवादळ असणार आहे. या चक्रीवादळाचं नाव तॉक्ते (Tauktae) असून हे नाव म्यानमारनं ठेवलं आहे. तॉक्ते याचा अर्थ मोठा आवाज करणारी पाल असा होतो. गुजरातबरोबरच गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि लक्षद्वीपला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.