सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर घरी येऊन बलात्कार (Rape Case) केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील बजाजनगर याठिकाणी घडली आहे. एवढचं नव्हे तर आरोपी तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून 25 वर्षीय पीडित तरुणीची 2 लाख रुपयांची फसवणूक (Fraud on the lure of marriage) देखील केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने वाळूंज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
संबंधित फसवणूक करणाऱ्या 28 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव रोहन राजेंद्र खाजेकर असून तो औरंगाबाद जिल्ह्यातील मुकुंदवाडी येथील रहिवासी आहे. तर पीडित तरुणी कामानिमित्त मुंबईला राहते. साधारणतः दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून पीडित तरुणीची ओळख आरोपी खाजेकर याच्यासोबत झाली होती. बरेच दिवस फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर आरोपी खाजेकर पीडितेला भेटण्यासाठी मुंबईलाही आला. त्याचबरोबर औरंगाबादमधील प्रोझोन मॉलमध्येही दोघांची भेट झाली होती.
आरोपी खाजेकर लग्नाचं आमिष दाखवून सातत्यानं पीडितेशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. मात्र तिने नकार दिला. दरम्यान मार्च महिन्यात पीडित तरुणी बजाजनगर येथील घरी असताना, आरोपी तरुणानं डबा घेण्याचा बहाणा करत पीडितेच्या घरात प्रवेश केला. यावेळी पीडित मुलगी घरात एकटी होती. या संधीचा फायदा घेऊन आरोपी तरुणानं पीडितेवर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेनं आरोपीला फोन केला असता, त्यानं बोलण्यास आणि लग्न करण्यास नकार दिला.
2 लाखांना घातला गंडा
फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर, काही दिवसांतच आरोपी तरुणानं पीडित तरुणीची आपल्या आईशी बोलणी करून दिली. यावेळी आरोपी तरुणाच्या आईनं पीडितेला सांगितलं की, तू मुंबईत नोकरी करत आहेस, लग्नानंतर संसारासाठी पैशे लागतील. त्यामुळे तू काही पैसे माझ्या मुलाकडे पाठवत जा. त्यामुळे पीडित तरुणीनं आरोपी तरुणाला दरमहा 10 ते 12 हजार रुपये पाठवले आहेत. दरम्यानच्या काळात तिने साधारणतः दोन लाख रुपये आरोपीच्या खात्यावर पाठवले. पैसे पाठवूनही खाजेकर यानं लग्नास नकार दिला, असं पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.