काही वेळा एखादया क्षुल्लक कारणावरून झालेले भांडण जीवघेणे ठरू शकते. कपडे वाळत घालण्यावरून दोन महिलांमध्ये झालेल्या भांडणामुळे एका महिलेचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गुरुदासपूरमधील तिब्बड पोलीस ठाण्याजवळील भुल्लेचक्क गावात ही घटना घडली आहे. या गावात राहणाऱ्या जसवीर कौर (65) आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रीटा या दोघींमध्ये एकाच भिंतीवर कपडे वाळत घालण्यावरून भांडण झाले. हे भांडण बराच वेळ सुरू होते. त्यानंतर ते इतके विकोपाला गेले की, दोघींमध्ये मारामारी सुरू झाली. यामध्ये जसबीर कौर जखमी झाल्या. यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी शेजाऱ्यांशी भांडण झाले. भांडण करताना त्यांनी धक्काबुक्की केल्यामुळे जसवीर खाली पडल्या, अशी तक्रार पोलिसांत नोंदवल्याची माहिती भुल्लेचक्क गावचे सरपंच मोहेंद्र सिंह यांनी दिली.
त्याच दिवशी सायंकाळी जसवीर यांचे डोके दुखू लागल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस ठाणे तिब्बडचे अधिकारी कुलवंत सिंह यांनी रुग्णालयात जाऊन जसवीर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जसवीर यांचे प्रेत शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले असून आम्ही नातेवाईकांकडे चौकशी करून पुढील तपास करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी कुलवंत सिंह यांनी दिली आहे.