नवी दिल्ली : देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या आणि मृत्यू दराचे आकडे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट थोपवण्याचा एकमेव मार्ग हा वेगवान लसीकरण आहे असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच भारत सरकारने लसीकरण मोहिमेत जास्तीजास्त लोकांना सामावून घेण्याचे धोरण अवलंबले आहे. पण, लसीकरणाची सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन असल्याने अनेक लोकांचा लसीकरणासाठीची वेळ निश्चित करताना गोंधळ उडत आहे. म्हणूनच लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी सोप्या पद्धतीने कशी करायची हे माहीत असणे गरजेचे आहे.
सध्याच्या प्रक्रियेनुसार लसीकरणासाठी आपल्याला एक तारीख दिली जाते त्या तारखेला आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन लसीकरण करावे लागते. लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करणे सध्या फार महत्वाचे आहे. लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन नाही झाल्यास आपल्याला लस मिळत नाही. कोरोना लसीकरण केंद्रावर कोणतीही गर्दी होऊ नये यासाठी रजिस्ट्रेशन मोहिम राबवण्यात येत आहे.
यापूर्वी कोव्हिन अॅप, वेबसाइट किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे नोंदणी करावी लागायची. दरम्यान सरकारचे अधिकृत अॅप असलेल्या उमंग अॅपवर कोरोना लसीकरण नोंदणी करण्याची सोय उपलब्द करून देण्यात आली आहे.
१) पहिल्यांदा प्ले स्टोअरवरून आपल्या फोनमध्ये उमंग अॅप डाउनलोड करावे लागते. दरम्यान त्या अॅपमधील हेल्थ टॅबवर जाऊन कोव्हिन विभाग निवडावा. यानंतर रजिस्ट्रेशन आणि लॉग इन करावे.
२) दरम्यान तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल यावेळी आपल्याला ओटीपीसाठी क्लिक करून ओटीपी घ्यावा त्यानंतर तो ओटीपी टाकून कोविन वेबसाईट उघडा.
३) याचबरोबर तुम्हाला आयडी प्रूफ ( आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन क्रमांक ), जन्मतारीख, नाव आणि लिंग इत्यादी माहिती भरावी लागेल. यानंतर सबमिटवर क्लिक करा.
४) तुम्ही पुढच्या पेजवर गेल्यानंतर अॅड मोअर हा पर्याय येतो. या पर्यायाची निवड करुन तुम्ही जास्तीजास्त ४ लोकांची नोंदणी करु शकता. त्यावेळी प्रत्येक व्यक्तीचा आयडी क्रमांक, वय, लिंग, जन्मसाल यांची माहिती द्यावी लागते.
५) नोंदणीकृत व्यक्तींची सर्व माहिती भरल्यानंतर तुमची एक छोटी प्रोफाईल तयार होईल. या प्रोफाईलमध्ये Schedule Appointment असा एक पर्याय असेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पीन कोड किंवा जिल्हा असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्हाला तुमच्या जवळच्याच ठिकाणीच लस घ्यायची असेल तर तुम्ही पीन कोड हा पर्याय निवडू शकता किंवा जर तुमची जिल्ह्यातील इतर ठिकाणी जायची तयारी असले तर तुम्ही जिल्हा हा पर्याय निवडावा लागेल. त्यात तुम्हाला राज्य जिल्हा निवडून उपलब्ध लसीकरण केंद्राची यादी मिळवता येईल.
६) या यादीत लाल रंगाने बुक असे लिहिले असेल तर त्या लसीकरण केंद्रातील त्या दिवसाचे सर्व डोस बुक झाले आहे. जर लसीकरण केंद्रासमोरील जागेत हिरव्या रंगामध्ये काही आकडे दिसले तर तेथे जितका आकडा आहे ( उदा. १०० ) तितके डोस त्या दिवशी उपलब्ध आहेत.
७ ) त्यानंतर हिरव्या रंगावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या दिवसात कोणत्या वेळी लसीकरणासाठी यायचे याचे स्टॉट दिले आहेत. त्यातीत एखादा स्लॉट आपल्या सोयीनुसार निवडून तुम्ही एक कोड येतो तो टाकून आपली वेळ निश्चित करु शकता.
८ ) वेळ आणि दिवस निश्चित झाल्यानंतर तुम्हाला एक चार अंकी सिक्रेट कोड एसएमएस द्वारे दिला जाईल. तो कोड लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना सांगावा लागेल. त्यानंतर तुम्ही लस घेऊन स्वतःला सुरक्षित करु शकता.