मुंबई: कोरोनाच्या बचाव हा फक्त आणि फक्त लसीकरण्याच्या माध्यमातूनच होतो हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. अशावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात लसीकरण होणं गरजेचं आहे. पण आता याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुरेशा प्रमाणात लसच उपलब्ध नसल्याने आता महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वत: आज (11 मे) पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यामुळे आता मोठा गाजावाजा करुन जे 18 ते 45 या वयोगटासाठी जे लसीकरण सुरु करण्यात आलं होतं त्याला आता ब्रेक लागला आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला का लागला ब्रेक?
आजवर लसीकरणात ४५ वयाच्या वरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आलं आहे. पण आता महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, याच वयोगटातील नागरिकांचं बरचंस लसीकरण हे शिल्लक राहिलं आहे. स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत जी माहिती दिली ती आपणा सर्वांना विचार करायला लावणारी आहे.
‘आज घडीला राज्यात 45 वयाच्या वरील ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे पण ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे अशांची संख्या ही 5 लाख एवढी आहे. केंद्र सरकारकडून या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनचे फक्त 35 हजार डोस आपल्याकडे आता उपलब्ध आहे. पण महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीचे जे पावणे तीन लाख डोस विकत घेतले होते असे मिळून तीन ते सव्वातीन लाख डोस हे आता 45 वयोगटातीला लोकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरले जाणार आहेत.’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.