महाराष्ट्रात कोरोना (Corona) व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वसामान्यसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार आणि कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके (Prakashdada Dahake ) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.
प्रकाश डहाके ( वय 67 ) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे लागण झाली होती. त्यांच्यावर मागील आठवड्याभरापासून नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कोविड मधून शनिवारी बरे झाले होते त्यांची चाचणी सुद्धा निगेटिव्ह आली होती. मात्र रक्तदाब कमी होऊन हृदय विकाराचा झटका आला होता, त्यात त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार कारंजा इथं करण्यात आला. राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांचे ते मेहुणे आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रध्दांजली
वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाशदादा डहाके यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. प्रकाशदादा डहाके यांच्या निधनाने ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेले, शेतकरी, कष्टकरी बांधवांची दु:ख दूर करण्यासाठी तळमळीनं कार्य करणारे संघर्षशील नेतृत्वं हरपले आहे. प्रकाशदादांचं निधन ही कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाची, वाशिम जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक चळवळीची तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी आहे. मी स्वर्गीय प्रकाशदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सर्वजण डहाके कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.