अकोला – कोरोनाची दुसरी लाट ही ग्रामीण भागात अधिक वेगाने फैलावत आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवा,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले. आज जिल्हाधिकारी पापळकर यांनी दूरस्थ पद्धतीने ग्राम प्रशासनाशी संवाद साधला. ग्रामीण भागात लग्न समारंभ हे २५ लोकांच्या उपस्थितीतच पार पडतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, याबाबत उल्लंघन होणार नाही याची खबरदारी स्थानिक पोलीस पाटील, ग्रामसेवक व तलाठी यांनी घ्यावी,असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव शुक्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे जिल्हा मुख्यालयातून तर अकोला, अकोट, मुर्तिजापूर या तालुक्यांचे तहसिलदार तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व तलाठी हे आपापल्या ग्रामपंचायतीतून सहभागी झाले होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात अधिक संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना शासनाने लागू केल्या आहेत. या उपाययोजनांचे पालन काटेकोरपणे व्हावे, याकडे ग्रामपातळीवरील व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी जादा लक्ष द्यावे. मास्कचा वापर, परस्पर अंतर राखणे, विवाहासारख्या आयोजनांमध्ये २५ पेक्षा अधिक लोकांचाच सहभाग या सारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी लवकर चाचणी व लगेच रुग्णालयात उपचार या पद्धतीचा अवलंब करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.
आपापल्या गावात लसीकरण मोहीम राबविण्यासाठी गावात लसीकरण नोंदणी पंधरवाडा राबवावा, त्यामुळे लोकांची नोंदणी होऊन लसीकरण राबविणे सोपे होईल. या शिवाय गावात चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. या निर्बंधांच्या काळात जनतेला अन्न धान्य उपलब्धतेसाठी शासनाकडून होत असलेले मोफत धान्य वितरण हे अधिकाधिक गरजूंपर्यंत कसे पोहोचेल याकडे स्थानिक कर्मचाऱ्यांनी अधिक लक्ष द्यावे,असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी सहभागी ग्राम पातळीवर अधिकारी- कर्मचाऱ्यांना निर्देश दिले.