नवी दिल्ली : नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनबाबत हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. यंदा मॉन्सून सर्वसाधारण तारखेला म्हणजेच १ जूनला केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने आज गुरुवारी (दि.६) दिली आहे. मॉन्सून केरळमध्ये वेळेत दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि हवामानशास्त्रज्ञ एम. राजीवन यांनी म्हटले आहे.
याआधी हवामान विभागाने जून ते सप्टेंबर दरम्यान मॉन्सून यंदा सामान्य राहील, असा अंदाज वर्तवला होता. सरासरी ९६ ते १०४ टक्के इतका पाऊस सामान्य समजला जातो. यंदा सरासरीच्या ९८ टक्के (कमी-जास्त ५ टक्के) पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते.
यंदा मॉन्सून दरम्यान एल निनोचा प्रभाव कमी राहणार असल्याचे संकेतही हवामान विभागाने याआधी दिले आहेत. भारतीय मॉन्सूनवर एल निनो आणि ला निना या प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील तापमानाचा प्रभाव राहतो. या स्थितीकडे भारतीय हवामान विभाग बारीक लक्ष ठेवून आहे.
मॉन्सून १ जूनला केरळमध्ये धडकल्यानंतर साधारणपणे ७ जूनपर्यंत त्याचे तळकोकणात आगमन होते. तर त्यानंतर १० जूनपर्यंत मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांशा भाग व्यापून टाकतो. त्यानंतर १५ जूनपर्यंत पूर्व भारतातील राज्य, गुजरात आणि मध्य प्रदेशाचा बहुतांश भाग मॉन्सूनने व्यापतो.