मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती होणार आहे. भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. अ तसेच ब वर्गातील प्रत्येकी २ हजार आणि क तसेच ड वर्गातील प्रत्येकी १२ हजार पदे भरणार आहोत. यामध्ये डॉक्टर्स, ॲडमिनिस्ट्रेशनसह वॉर्ड बॉय, ड्रायव्हर यासारखी पदे असतील, असेही त्यांनी सांगितले.
टोपे म्हणाले, की अ वर्गाची परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातून घेतली जाईल. ब वर्गात डॉक्टर्सच्या मुलाखती घेऊन पदभरती केली जाईल. क आणि ड वर्गाची परीक्षा एजन्सीच्या माध्यमातून घेतली जाईल. तसेच ॲडमिनिस्ट्रेसऩच्या जागाही भरल्या जातील. ही पदे भरल्यानंतर स्थैर्य निर्माण होईल.
लिक्विड ऑक्सिजनचा राज्याचा कोटा कमी करणं योग्य नाही. कोव्हॅक्सिनचा डोस देणं अतिशय आवश्यक आहे. याबाबत केंद्र सरकारकडे आजचं अपील करणार आहे. केंद्र सरकारकडून कोव्हॅक्सिनचा डोस मिळवायचाच आहे. गरज पडल्यास सध्या खरेदी केलेले डोस देण्याची तयारी आहे, असे टोपे यांनी नमूद केले.
कोरोनाची तिसरी लाट जुलै, ऑगस्टमध्ये येणार…
राजेश टोपे म्हणाले, रेमडेसिवीरचं वाटप न्यायपध्दतीने केले जात आहे. प्रश्न फक्त कोव्हॅक्सिनचा आहे. कोव्हिशिल्डबाबत कुठलीही अडचण नाही. तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारने आधीच इशारा दिला आहे. कर्नाटकचा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात मनुष्यबळ, बेड्स, औषधे सामुग्री वाढवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाची तिसरी लाट जुलै, ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता आहे.
रेडमेसिवीरच्या दराबाबत टोपे म्हणाले, केंद्र सरकारने अंतर्भाव करण्याची गरज आहे. काही ठिकाणी रेमडेसिवीरचा ९०० रूपये दर आहे. तर काही ठिकाणी काही कंपन्यांचा ३ हजार रुपये दर आहे. हा दर कमी करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही टोपे यांनी सूचित केले.