सीबीएसई class 11th Admission 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने (CBSE) आपल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठी दिलासा देणारी माहिती दिली आहे. बोर्डाने त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतले काही नियम शिथील केले आहेत, ज्यांचा दहावीचा निकाल (CBSE 10th result 2021) यंदा येणार आहे आणि ते अकरावी प्रवेशाची (CBSE 11th admission 2021) तयारी करत आहेत. सीबीएसईने इयत्ता अकरावी प्रवेशाच्या बाबतीत काय निर्णय घेतला आहे जाणून घेऊ…
सीबीएसईने रविवारी, २ मे रोजी दहावी निकालासंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे. यात विना बोर्ड परीक्षा दहावीचा निकाल कसा तयार केला जाईल याचे निकष सांगण्यात आले आहेत. मार्किंग स्कीम आणि यासोबतच अकरावी प्रवेश कसे होतील याची माहिती देण्यात आली आहे. यात दोन प्रकारच्या सवलतींबाबतची सूचना देण्यात आली आहे.
-
CBSE 11th admission 2021: ही आहे सवलत
बोर्डाने अकरावी प्रवेशांसाठी गणित विषयातील बेसिक आणि स्टँडर्डचा नियम हटवला आहे. सीबीएसईने २०१९ या शैक्षणिक वर्षात दहावीत गणिताचे बेसिक आणि स्टँडर्ड असे दोन प्रकारचे विषय सुरू केले होते. ज्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर गणित विषय अभ्यासायचा नाही त्यांच्यासाठी बेसिक (CBSE Maths Basic) गणित होता. जे विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणातही गणित विषयाचा अभ्यास करणार आहेत, त्यांच्यासाठी स्टॅँडर्ड मॅथ्स (CBSE Maths Standard) हा विषय होता.
सीबीएसई बोर्डाच्या अकरावी इयत्तेत गणित शिकायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी दहावीला स्टँडर्ड मॅथ्स विषय घेतलेला असणे अनिवार्य आहे. असे नसल्यास अकरावीत मॅथ्स घेण्यासाठी दहावीत बेसिक मॅथ्स घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेत स्टँडर्ड मॅथ्सची परीक्षा देणे आवश्यक आहे. मात्र यंदाच्या वर्षापुरता हा नियम लागू असणार नाही. कोविड-19 (Covid-19) मुळे सीबीएसईने २०२० मध्ये पहिल्यांदा हा निर्णय घेतला होता की ज्या विद्यार्थ्यांनी दहावीत बेसिक गणित घेतले आहे, ते देखील अकरावीत गणित विषय घेऊ शकतात. त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. करोनामुळे यंदाही हा नियम कायम ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा: Medical Exam Postponed : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा जूनमध्ये होणार
-
दुसरी सवलत काय आहे?
यंदा दहावीचा निकाल बोर्ड परीक्षेविनाच तयार होत आहे. शालेय स्तरावरील चाचण्या आणि प्री-बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल तयार करण्यात येणार आहे. जर या निकषांद्वारे मूल्यमापन करताना कोणी विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही, तरी तो अकरावीत प्रवेश घेऊ शकतो. सीबीएसईने याची परवानगी दिली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी कंपार्टमेंट म्हणजेच पुरवणी परीक्षा होणार आहे. जोपर्यंत या विद्यार्थ्यांचा कंपार्टमेंटचा निकाल येत नाही, तोपर्यंत ते आपला अकरावीचा अभ्यास सुरू ठेवू शकतात.