नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) व्हायरस दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज भारतात साडे तीन लाखांच्यावर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांना प्राण गमावावे लागत आहे.
दरम्यान, कोरोनाचा नवीन स्ट्रेन आरटीपीसीआरच्या (RTPCR) टेस्ट रिपोर्टला (Test Report) सुद्धा चकमा देत आहे. कारण, बर्याच वेळा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असतो, परंतु टेस्ट रिपोर्टमध्ये निगेटिव्ह (Corona Negative Report) येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जर तुम्ही कोरोनापासून बरे झाले असाल तर या व्हायरसने तुमच्या शरीरावर किती नुकसान केले आहे, हे तपासण्यासाठी तुम्हाला काही टेस्ट करणे महत्वाचे आहे. कोणत्या टेस्ट करायच्या आहे, ते पाहूया…
अँटीबॉडी टेस्ट
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसमुळे शरीराच्या अनेक अवयवांचे नुकसान होते. विशेषत: कोरोना व्हायरस फुफ्फुसांवर आणि रोगप्रतिकारक यंत्रणेवर हल्ला करतो. यासाठी तुम्हाला अँटीबॉडी टेस्ट करणे महत्वाचे आहे. तुमच्या शरीरातील अँटीबॉडीजची स्थिती काय आहे, हे या टेस्टद्वारे माहीत होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर दोन आठवड्यांनी ही टेस्ट करावी.
CBC Test
सीबीसी टेस्ट म्हणजे कंम्प्लीट ब्लड काऊंट टेस्ट, शरीरातील वेगवेगळ्या पेशींची तपासणी करण्यासाठी टेस्ट केली जाते. यामुळे रुग्णाला कोरोना संसर्गाविरूद्ध त्याचे शरीर कसे प्रतिक्रिया देत आहे, याचा अंदाज येतो. कोरोनातून बरे झाल्यानंतर ही चाचणी लोकांसाठी खूप महत्वाची आहे.
शुगर टेस्ट
शुगर आणि कोलेस्ट्रोल टेस्ट देखील खूप महत्वाची आहे. शुगर असलेल्या रुग्णांसाठी ही चाचणी विशेषतः महत्त्वपूर्ण आहे. कोरोनादरम्यान बर्याच वेळा लोकांच्या शरीरात शुगरची पातळी वाढते. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी क्रिएटिनिन, लिव्हर आणि किडनी फंक्शन टेस्ट देखील करण्यास सांगितले जाते.