हैदराबाद : मनुष्यासह आता प्राण्यांमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. हैदराबाद येथील नेहरू झुलॉजिकल पार्कमधील ८ आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. सिंहांना कोरोना होण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे.
हैदराबाद येथील नेहरू झुलॉजिकल पार्क ३८० एकर क्षेत्रात पसरले आहे. येथे सुमारे २ हजार प्राणी आहेत. या पार्कला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीने (सीसीएमबी) आठ सिंहांचा कोरोना चाचणी अहवाल (आरटी-पीसीआर) पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती सीसीएमबीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. पार्कमधील सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सीसीएमबी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सीसीएमबी हे कोविड-१९ संसर्ग निश्चितीसाठीचे अधिकृत चाचणी केंद्र आहे.
वाचा : कोरोना मध्ये ‘सीटी स्कॅन’ करताय तर हे नक्की वाचा
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयातील आठ वाघ आणि सिंहांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कुठेही प्राण्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले नव्हते. पण हाँगकाँगमध्ये श्वान आणि मांजरांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, अशी माहिती वाईल्डलाईफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरचे संचालक डॉ. शिरीष उपाध्ये यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे.
हैदराबादच्या पार्कमधील सफारी क्षेत्रातील काही सिंहांमध्ये नाक वाहणे, भूक मंदावणे आणि खोकल्याची लक्षणे दिसून आली आहेत. येथे सुमारे १० वर्ष वयाचे १२ सिंह आहेत. यातील चार नर आणि चार मादी सिंहांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.