नवी दिल्ली : अखेर आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघातील अनेक खेळाडू आजारी पडले आहेत. वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आज कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात होणारा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. आयपीएल वेळापत्रकानुसार हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज सायंकाळी साडेसात नियोजित होता. पण दोन खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने आजच्या सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आल्याचे आयपीएलने अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे.
वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या दोन खेळाडूंनी स्वतःला आयसोलेट केले आहे. वैद्यकीय पथक त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहे. या खेळाडूंच्या जे कोणी संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेतला जात असल्याचे आयपीएल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
हे पण वाचा : सचिन तेंडुलकर आला मदतीला धावून, ऑक्सिजनसाठी एक कोटी रुपये दान
याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केकेआरमधील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आरसीबी संघ त्यांच्याविरुद्ध आजचा सामना खेळण्यास उत्सुक नाही. यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.
यंदाच्या आयपीएल हंगामापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली होती. कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज नितीश राव याचादेखील अहवाल अगोदर पॉझिटिव्ह आला होता. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वी तो कोरोनामुक्त झाला. तसेच भारतात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अॅंड्रू टाये, केन रिचर्डसन आणि अॅडम झांपा हे मायदेशी परतले आहेत. आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना मायदेशात परतण्यासाठीची व्यवस्था त्यांना स्वत:च करावी लागेल, अशी स्पष्ट भूमिका ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी घेतली होती.
आर. अश्विनच्या घरातदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. याबाबत अश्विनची पत्नी प्रीती नारायणनने कुटुंबातील १० जणांना कोरोना झाल्याचे माहिती ट्विट करत दिली होती. या कारणामुळे अश्विनने आयपीएलमधून माघार घेतली आहे आणि कुटुंबाला प्राधान्य दिले आहे.