यवतमाळ : वादळी वाऱ्याने पाळणा उडाल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आर्णी तालुक्यातील लोणी येथे शनिवारी घडली.
गावातील सुनील राऊत यांच्या घरावर लोखंडी अँगलवर टिनाचे छप्पर होते व त्या अँगलला दीड वर्षाच्या चिमुकल्याचा पाळणा बांधलेला होता. त्या पाळण्यात बाळ झोपून होते. शनिवारी दुपारी लोणी येथे अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. या वादळामुळे घरावरील छप्पर पाळण्यासह तब्बल शंभर फूट उंच हवेत उडाले आणि खाली कोसळले. यामध्ये दीड वर्षाच्या बाळाला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मंथन सुनील राऊत असे मृत बालकांचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.