अकोला: वय वर्षे १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तिंसाठी कोविड लसीकरणास शनिवार दि.१ मे पासून सुरुवात होत आहे. या संदर्भात जिल्ह्यास सध्या ७५०० कोविशिल्ड या लसींचे डोस उपलब्ध झाले असून सद्यस्थितीत अकोला शहरातील पाच लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. नंतर जसे जसे डोस उपलब्ध होतील तसे अन्य लसीकरण केंद्र कार्यान्वित होतील.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, लसीकरणासाठी लाभार्थ्यांना कोविन ॲप वरुन नोंदणी करणे व त्यानुसार लसीकरणाची तारीख व वेळ निश्चित करणे अनिवार्य आहे. लस उपलब्ध होण्यास होणारा संभाव्य उशीर लक्षात घेता दि.१ मे रोजी लसीकरण हे दुपारी एक ते पाच यावेळात करण्यात येईल. अन्य दिवशी लसीकरण हे सकाळी नऊ ते पाच यावेळात सुरु राहिल.
अकोला शहरात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भरतीया रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, डाबकी रोड, आर.के.टी. आयुर्वेद कॉलेज जठारपेठ आणि जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे लसीकरण उपलब्ध होईल.
अकोला महानगरात वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता अकोला मनपा क्षेत्रात सोमवार दि.३ मे पासून लसीकरणाची वेळ सकाळी सात ते दुपारी एक करण्याचा निर्णय मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी घेतला आहे.
नागरिकांनी नोंदणी नंतर निश्चित केलेल्या वेळेत लसीकरण केंद्रावर नाव नोंदवून आपले टोकन प्राप्त करुन घ्यावे. लसीकरण केंद्रांवर मास्क वापरावा, सॅनिटायझर वापरावे, परस्परांमध्ये अंतर राखावे, गर्दी करु नयेअसे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
लसीकरणाला येण्यापुर्वी भरपेट नाश्ता करावा, उपाशी पोटी जाऊ नये. पुरेशी झोप घेऊन जावे. अन्य आजारांची जसे रक्तदाब, मधुमेह इ. चे औषधे सुरु ठेवावीत, आवश्यकता भासल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केला आहे.