मुंबई : राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेडिकलला शिकणाऱ्या एका 23 वर्षीय विद्यार्थ्याने तिच्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. (Mumbai Jogeshwari Five year-old girl raped by medical student)
मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या नराधमाकडून बलात्कार
मुंबईतील जोगेश्वरी भागात बेहराम बाग नावाचा परिसर आहे. या ठिकाणी एका पाच वर्षीय मुलीवर 23 वर्षीय मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या नराधमाने बलात्कार केला. गुरुवारी (29 एप्रिल) संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे आजूबाजूचा परिसर हादरला आहे. सुनील सुखराम गुप्ता असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलीच्या घर मालकाचा मुलगा आहे.
नेमकं काय घडलं?
या पीडित मुलीचे कुटुंब आरोपीच्या घरातील पोटमाळ्यावर भाड्याने राहते. काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे ती आरोपीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली. त्यावेळी नराधम आरोपीने दरवाजा बंद करुन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर काही वेळाने ती मुलगी घरी आली असता रडत होती. तिच्या आईने तिला विचारले असता, तिने हा सर्व घडलेला प्रकार सांगितला.
आरोपीला अटक
यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने याबाबत ओशीवरा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर ओशीवरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी सुनीलला लगेचच बेड्या ठोकण्यात आला.
कठोर शिक्षा व्हावी, अशी स्थानिकांकडून मागणी
दरम्यान या सर्व घडलेल्या घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण परिसर हादरला आहे. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. (Mumbai Jogeshwari Five year-old girl raped by medical student)