पुणे : राज्य सरकार आरटी-पीसीआर चाचणीसाठी ड्राय स्वॅब तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या हालचाली करत असल्यामुळे लवकरच कोव्हिड-19चा चाचणी अहवाल आता केवळ चार तासांत मिळू शकेल. हे तंत्रज्ञान आरटी-पीसीआरच्या पारंपरिक पद्धतीवरूनच अवलंबण्यात आले आहे. या तंत्रात महागड्या लिक्विड व्हायरल ट्रान्स्पोर्ट मीडियमचा वापर न करता नाक व घशातील स्राव कोरड्या (ड्राय) अवस्थेत घेतला जातो. यामुळे स्वॅबचा नमुना हाताळणे सोपे जाते आणि द्रव सांडण्याची तसेच संसर्ग फैलावण्याची शक्यता कमी होते.
या चाचणीत नमुन्यातून आरएनए आयसोलेशनची स्टेप वगळण्यात आली आहे. त्यामुळे 12 तासांत मिळणारा अहवाल केवळ चार तासांत मिळू शकतो. महाराष्ट्राने एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात दररोजच्या चाचण्यांची संख्या 1 लाख 20 हजारांवरून 2 लाख 50 हजारांपर्यंत वाढविली होती आणि तेव्हापासून ही संख्या कायम आहे. राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राज्य सरकार लवकरच सर्व प्रयोगशाळांमध्ये आयसीएमआरने मंजुरी दिलेल्या ड्राय स्वॅब तंत्रज्ञानाचा वापर करेल.
हे पण वाचा : लक्षणं असतानाही या कारणांमुळे तुमची कोरोनाची टेस्ट येऊ शकते निगेटिव्ह
सीसीएमबीचे संचालक राकेश मिश्रा म्हणाले, की कोणत्याही नव्या गुंतवणुकीशिवाय चाचणीची ही पद्धत अवलंबण्यात येणार आहे. ही चाचणी अतिशय कमी किंमतीत आणि कमी वेळेत होणार असल्यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. या नव्या पद्धतीत सुमारे 500 नमुन्यांसाठी केवळ चार तासांचा कालावधी लागणार आहे. नमुन्यांमधील आरएनए आयसोलेशनसाठी वेळ, किंमत आणि प्रशिक्षित मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागत होते. ड्राय स्वॅब चाचणी कमी किंमतीत तसेच कोणत्याही नव्या उपकरणांशिवाय आणि उपलब्ध मनुष्यबळामध्ये करता येणार आहे. यामुळे चाचण्यांची संख्याही वाढविता येणार असल्याचे मिश्रा यांनी नमूद केले.
कशी होते ड्राय स्वॅब टेस्ट?
ड्राय स्वॅब टेस्टमध्ये नाक किंवा घशातून घेण्यात येणार्या स्रावाच्या नमुन्याचे संचालन शुष्क अवस्थेतच केले जाते. यामुळे चाचणीच्या पूर्ण प्रक्रियेत नमुन्यातील द्रव सांडणे आणि संक्रमणाचा धोका अतिशय कमी असतो. या पद्धतीत आरएनएला (रायबोज न्यूक्लीक अॅसीड) वेगळे करण्याच्या टप्प्याची गरज भासत नाही. याचा उपयोग थेट आरटी-पीसीआर चाचणीत केला जाऊ शकतो.