पिंपरी: बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत 22 मृतदेह कोंबल्याची धक्कादायक घटना उघड झालेली असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये मानवतेला लाजवणारी घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आईच्या मृतदेहाशेजारी एक दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस उपाशीच बसून होता. या महिलेला कोरोना असण्याच्या भीतीने कोणीही या मुलाजवळ फिरकले नाही. या घटनेवर संताप व्यक्त होत असून कोरोना महामारीमुळे लोक किती भयभीत झाले आहेत, याचं विदारक चित्रंही समोर आलं आहे. (woman found dead in pimpri chinchwad)
पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सरस्वती राजेशकुमार असं या महिलेचं नाव आहे. निवडणूक असल्याने तिचा पती उत्तर प्रदेशात गेला होता. ती आणि दीड वर्षाचा मुलगा दोघेच घरी होते. मात्र, तिचा मृत्यू झाला. घरात कोणीच नव्हतं. हा दीड वर्षाचा मुलगा मृतदेहासोबत खेळत होता. दोन दिवस उपाशी होता. घरात मृतदेहाशेजारी मुलगा खेळत असल्याचं पाहूनही कोणीच या मुलाला घेण्यासाठी धजावले नाही. या महिलेला कोरोना झाला असावा या भीतीने कोणीही पुढे आले नाही. अखेर दोन दिवसानंतर पोलिसांना हा प्रकार कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुशीला गबाले आणि रेखा वाजे या दोन महिला पोलिसांनी या मुलाला जवळ घेतले. त्याला दूध आणि बिस्किट दिलं. त्यानंतर या मुलाला शिशूगृहात दाखल केलं. सध्या या मुलाची प्रकृती ठिक आहे. महिलेचा पती अजूनही उत्तर प्रदेशातून आलेला नाही. मात्र, दोन दिवस उपाशी असलेल्या मुलाला कोणीही जवळ न घेतल्याने एकच संताप व्यक्त होत आहे.