अमरावती : श्वसनसंस्थेची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित वाफ परिणामकारक ठरते, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय साऊरकर यांनी सांगितले. श्वसनसंस्था निरोगी ठेवणे व तिला विषाणूस प्रतिकार करण्यासाठी मजबुत बनविणे यासाठी वाफ घेणे उपयुक्त ठरते. स्टीम सप्ताहानिमित्त ही बाब सर्वांनी अंगीकारली पाहिजे, असे आवाहन डॉ. साऊरकर यांनी केले. ते म्हणाले की, श्वसनात आपण ऑक्सिजनयुक्त हवा शरीरात घेतो व कार्बनडायऑक्साईड बाहेर टाकतो. ऑक्सिजनची नैसर्गिक उपलब्धता पर्यावरणात असतेच, पण जेव्हा श्वसनसंस्थेला बाधा पोहोचते तेव्हा तो कृत्रिमरीत्या उपलब्ध करून द्यावा लागतो. त्याची जाणीव कोरोनाकाळाने आपल्याला करून दिली आहे. त्यामुळे वाफ घेण्याचे महत्व कळण्यासाठी श्वसनसंस्थेची रचना जाणून घेणे महत्वाचे ठरेल.
नाकपुड्या ते फुफ्फुस व्हाया ‘ध्वनीचा डब्बा’
श्वासातील ऑक्सिजन फुफ्फुसांत वेगळा होऊन रक्तात मिसळतो व रक्तातील कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसांमध्ये उच्छवासाद्वारे मिसळून फुफ्फुसातून बाहेर टाकला जातो. रक्तातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण अधिक असेल तर श्वसनाचा वेग वाढतो. मानवी श्वसनसंस्थेची सुरुवात नाकपुड्यांपासून होते. नाकपुड्यातुन हवा आत जाताना ती सुरुवातीला नाकातील सुक्ष्म केसांमार्फत गाळली जाते म्हणून धुळीचे कण, माती असे टाकाऊ घटक फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाहीत. घसा हा अवयव श्वसननलिका व अन्ननलिका या दोन्हींशी संबंधित असतो. घश्याद्वारे आलेला वायू श्वसननलिकेकडे कंठाद्वारे जातो. श्वसननलिका या भागाद्वारे आवाज निर्माण करू म्हणून त्या भागाला ‘ध्वनीचा डब्बा’ म्हणतात. श्वसननलिका पुढे येऊन ती दोन्ही फुफ्फुसांना जोडलेली असते. छातीमध्ये श्वासनलिकेला दोन फाटे फुटतात. त्यातला एक उजव्या, तर दुसरा डाव्या फुफ्फुसाकडे जातो. छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी एक अशी दोन फुफ्फुसे असतात व ती अहोरात्र काम करत असतात. सामान्य श्वसनदर हा दर मिनिटाला 18 ते 24 असतो. तसेच सामान्यतः शरीरातील ऑक्सिजन पातळी ही 93 टक्यांपेक्षा अधिक असावी.
शरीरविज्ञानातील बाष्पमहात्म्य
नाक हे श्वसनमार्गाचे द्वार आहे. वाफ नाकावाटे श्वसनक्रियेदरम्यान थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचते, तेव्हा वाफेचा प्रभाव नाक, घसा, श्वसनमार्ग, श्वसननलिका, फुफ्फुस यावर थेट होतो. त्यामुळे श्वसनमार्गातील सूज, अवरोध कमी होतो, त्याचप्रमाणे, श्वसनमार्ग,श्वसननलिका याठिकाणी चिकटलेला कफ, स्त्राव सुटुन मोकळा होतो. श्वसनमार्ग विस्तारित होतो व त्यामुळे स्त्रोतसशुध्दी होते. त्यामुळे श्वसनप्रक्रिया सुलभ होऊन शरीरातील ऑक्सिजनची क्षमता व पातळी वाढण्यास मदत होते. सर्दी, खोकला होतो तेव्हा आपण परंपरेनुसार घरगुती उपचारात वाफ घेतो व त्यापासून आरामही मिळतो. दवाखान्यांतही नेबुलायझेशनव्दारे अनेकदा लहान बालके, अस्थमा रूग्ण यांना वाफा-याच्या यंत्राचा वापर करून औषधे थेट फुफ्फुसांपर्यंत पोहचवून उपचार केले जातात.
वाफ कशी घ्यावी
घरातील स्वच्छ भांड्यात स्वच्छ साधे पाणी टाकून भांडे गरम करून पाण्याची वाफ होऊ लागल्यावर चेहरा टॉवेल अथवा तत्सम कापडाने झाकून दोन ते तीन मिनिटे वाफ घ्यावी.आयुर्वेदशास्त्रानुसार तुळशीची दोन तीन पाने , थोडासा भिमसेनी कापूर, निलगिरी तेलाचे दोन ते तिन थेंब टाकुन सुद्धा वाफ घेऊ शकतो. या बाबीही अवरोध कमी करण्यासाठी चांगले काम करतात.
वाफ घेण्यासाठी आजकाल बाजारात इलेक्ट्रिक स्टीमर उपलब्ध आहेत. वाफ शक्यतोवर सकाळी व संध्याकाळी घ्यावी. सध्या उष्णतामान अधिक असल्यामुळे दुपारी वाफ घेऊ नये. हृदयरुग्ण किंवा उच्च रक्तदाबाचा आजार असलेल्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार वाफ घ्यावी.
आरोग्य निरामय ठेवण्यासाठी योगाभ्यास, प्राणायामाचा अवलंब केल्यास अधिक फायदेशीर ठरते. कोरोनापासून प्रतिबंधासाठी दक्षता त्रिसूत्री पालन करण्याबरोबरच दिवसातून किमान दोनदा वाफ घेणे फायदेशीर ठरू शकते, असे डॉ. धनंजय साऊरकर यांनी नमूद केले.