विरार : नाशिकमधील एका रुग्णालयात ऑक्सिजन टाकीचा पाइप फुटून झालेल्या गळतीमुळे २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. ही घटना ताजी असताना आता विरारमधील एका रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही आग लागली. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगीनंतर रुग्णालयातील अन्य रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे.
‘सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण…’ – राज ठाकरे
विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडुप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
ही घटना अतिशय दुर्दैवी, क्लेशदायक – उपमुख्यमंत्री अजित पवार
“विरारच्या विजय वल्लभ कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत होरपळून रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले; ही घटना अतिशय दुर्दैवी, क्लेशदायक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल मी सहसंवेदना व्यक्त करतो. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून त्यात रुग्ण मृत्युमुखी पडणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील,याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.रुग्णालयांची सुरक्षितता,फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशात अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रूटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्यानं घेतली जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा मला विश्वास आहे.”
मुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयातील आगीच्या चौकशीचे निर्देश
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
विरारमधील वल्लभ कोविड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.