अकोला: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज येणाऱ्या कोविड रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी पडू लागली आहे. त्या अनुषंगाने यंदा मेडिकलच्या विद्यार्थ्यांना बॉन्डसेवा सक्तीची केली आहे. त्या अनुषंगाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे १५० विद्यार्थ्यांना बॉन्डसेवा सक्तीची असणार आहे. या विद्यार्थ्यांना सेवेतून सवलत घ्यायची असल्यास १० लाख रुपये भरावे लागणार आहे. वैद्यकीय शिक्षणात पदवीधर झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी किंवा इतर काही कारणांसाठी विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या बॉन्ड सेवेतून सवलत घेणे आतापर्यंत शक्य होते, मात्र राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गंभीर रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत तज्ज्ञ मनुष्यबळही अपुरे पडत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली वाईट स्थिती पाहता यंदा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ही बॉन्डसेवा बंधनकारक राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. या बॉन्डसेवेतून विद्यार्थ्यांना सवलत मिळवायची असेल, तर त्याला दहा लाख रुपये भरावे लागणार आहेत. यासेवेसाठी २१ एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या वर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे १५० विद्यार्थ्यांना ही बॉन्डसेवा बंधनकारक असणार आहे. यातून सवलत मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी रक्कम भरावी लागणार आहे.
मेडिकल पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी – १५०
गत पाच वर्षांत
सवलत घेतलेले विद्यार्थी – १
सेवा केलेले विद्यार्थी – ७४९
बहुतांश विद्यार्थी करतात बॉन्डसेवा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बहुतांश एमबीबीएसचे विद्यार्थी येथेच पुढील शिक्षण घेतात. त्यामुळे येथील येथील विद्यार्थी क्वचितच बॉन्डसेवेत सवलत घेत असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असले, तरी अनेक जण ग्रामीण भागात रुग्णसेवा देण्यास टाळतात, मात्र योग्य पर्याय नसल्याने काही विद्यार्थी ग्रामीण भागात सेवा देतात, तर बहुतांश विद्यार्थी जीएमसीतच रुग्णसेवा देत असल्याचे दिसून येते.