बालविवाह अमरावतील जिल्ह्यातील मोर्शी तालुक्याच्या अंबाडा गावात बजारा समाजाच्या एका कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींचा बालविवाह जिल्हा बाल संरक्षण समितीनं रोखला आहे.
टाळेबंदी लागू असतानाही जिल्ह्यात विवाह सोहळे सुरू असून चक्क बालविवाहांच्या घटनाही समोर येत आहेत. दोन अल्पवयीन बहिणींचं एकाच मांडवात लग्न लावून देण्याचा प्रकार मोर्शी तालुक्यात नुकताच उघडकीस आला आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षानं तातडीनं हालचाली करत हा विवाह रोखला आहे.
बालविवाह ही घटना मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथे नुकतीच घडली. अंबाडा येथे बंजारा समाजातील एकाच कुटुंबातील दोन बहिणींचा बाल विवाह होत असल्याची माहिती ग्राम बाल संरक्षण समितीला मिळाली. ही बाब कायद्याने गुन्हा असल्याने त्यांनी याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला माहिती दिली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी सहकाऱ्यांसह विवाहस्थळ गाठले.
पालकांकडे मुलींच्या जन्मातारखेबाबात विचारणा केली, परंतु त्यांनी जन्मातारीख माहीत नसल्याचे सांगितले. दरम्यान अंगणवाडी केंद्रातून अधिकाऱ्यांनी या मुलींची जन्मतारीख शोधली असता, मोठी मुलगी विवाह योग्य होण्यासाठी तिचं वय तीन महिन्यांनी कमी पडत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं लहान बहिणीची जन्मतारीख शोधण्याचा प्रश्नच नव्हता. असा विवाह कायद्यानं गुन्हा असल्यानं अधिकाऱ्यांनी मुलींच्या पालकांना सांगून होणारा विवाह रोखला. बालविवाह रोखल्यानंतर अधिकाऱ्यांनी पालकांना समज देऊन त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं.
पालकांनी दिले हमीपत्र
ग्रामपंचायत व ग्राम बाल संरक्षण समितीने पत्राद्वारे मुलींच्या वडिलांना लग्न न करण्याच्या सूचना दिल्या. पालकांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना मुली १८ वर्षांच्या झाल्यानंतरच लग्न करणार असल्याचं हमीपत्र लिहून दिलं. ग्राम बाल संरक्षण समितीच्या समयसूचकतेमुळं दोन बाल विवाह टळल्यानं समितीचं कौतुक होत आहे.