अकोला – अकोला जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांमध्ये व्हावयाच्या रिक्त पदाच्या निवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली, असे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक विभागाचे प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेचे १४ गट व त्याअंतर्गत २८ गणांत निवडणूक व्हावयाची आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने दि.१७ मार्च रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. संबंधित तहसिलदारांनी अंतिम मतदार याद्या दि.२० रोजी प्रसिद्ध करुन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील सुचना फलकावर प्रसिद्ध केल्या आहेत. जिल्हा परिषदेतील निवडणूक विभाग, त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांच्य्या मतदार याद्या माहितीसाठी संबंधित तहसिलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत, असेही निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प., पं.स. ग्रा.पं. निवडणूक विभाग अकोला संजय खडसे यांनी कळविले आहे.