हिवरखेड (धीरज बजाज)- समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून हिवरखेड येथील जागरुक आणि कर्तव्यदक्ष पत्रकार बांधवांनी एकत्रित येत आदर्श पत्रकार संघाची स्थापना केली असून गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती इत्यादींचे औचित्य साधत दिनांक 13 एप्रिल गुढीपाडव्या रोजी मराठी नववर्ष दिनी सामाजिक बांधिलकी जोपासत मूक पक्षांसाठी जागोजागी पाणीपात्रांची व्यवस्था करून आपल्या कार्याची सुरुवात केली. तत्पूर्वी धर्मदाय आयुक्त अकोला यांच्याकडे आदर्श पत्रकार संघाची विधीवत नोंदणी करण्यात आली. ज्याचा नोंदणी क्र. महाराष्ट्र 198/2020, एफ 20420 आहे.
आता आदर्श पत्रकार संघाकडून अनेक प्रकारचे सामाजिक कार्य करण्यात येणार असून जनतेच्या सेवेत पदार्पण करताच हिवरखेड येथे शिवभोजन थाळीची व्यवस्था करावी तसेच हिवरखेड येथे गौरक्षण सुरू करण्याची परवानगी मिळण्यासाठी आदर्श पत्रकार संघामार्फत तेल्हारा तहसीलदार डॉ संतोष येवलीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.अध्यक्षपदी संदीप इंगळे, सचिवपदी धिरज बजाज, उपाध्यक्षपदी सुरज चौबे, कोषाध्यक्षपदी जितेश कारिया, सहसचिवपदी अनिल कवळकार, संघटकपदी राहुल गिऱ्हे तर प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन खिरोडकार तर मार्गदर्शक म्हणून राजेश पांडव अशी कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
माणसाला तहान लागली तर तो बोलू शकतो, पाण्याची मागणी करू शकतो पण मूक पक्षी पाणी न मिळाल्यास आपल्या तहानेची व्यथा कोणाला सांगणार ही बाब लक्षात घेऊन उन्हाळा अत्यंत तापत असताना उन्हामुळे कासावीस झालेल्या मूक पक्ष्यांसाठी जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी. ह्या हेतूने आदर्श पत्रकार संघामार्फत संकटमोचन हनुमान मंदिर, रामदेवबाबा मंदिर, सदाशिव संस्थान, पोलीस ठाणे हिवरखेड, इस्सार पेट्रोल पंप, विलास लायटिंग, विठोबा धर्मकाटा, सोबतच अनेक ठिकाणी सावलीमध्ये झाडांच्या फांद्यांवर मूक पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची पात्रांची व्यवस्था करण्यात आली. सोबतच या पात्रांमध्ये नियमित पाणी भरण्याची जबाबदारी विविध व्यक्तींनी स्वेच्छेने स्वीकारली. यावेळी ठाणेदार धीरज चव्हाण आणि हिवरखेड येथील सर्व पोलीस बांधव, माजी पंचायत समिती सदस्य मधुकरराव पोके, नवलसेठ टावरी, जियाभाई, विलास भाऊ शुद्रे, ग्रा प कर्मचारी भारसाकळे, इत्यादींची वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थिती लाभली.