अकोटः अकोट मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव यांना मारहाण केल्याचे आरोपीखाली अकोट शहर पोलीसांनी गुन्हे दाखल करुन अटक केली.या प्रकरणी १८ एप्रिल रोजी न्यायालयाने त्याना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलीसातील अपराध पत्रानुसार, बाजार समिती कार्यालयात १७ एप्रिल रोजी सांयकाळी ५ वाजता दरम्यान बाजार समिती सहसचिव विनोद रमेश कराळे हे सहकारी कर्मचाऱ्यांसोबत काम करीत होते. यावेळी संजय लक्ष्मणराव गावंडे हे आले त्यांनी तुम्ही ड्युटी करीत नाही,लोकांना त्रास देता असे म्हणून शिवीगाळ करीत मारहाण करीत. सरकारी कामात अडथळा आणला. तसेच यापुढे लोकांची कामे वेळेवर नाही केली तर नौकरी करणे मुस्कील करुन देईल अशी धमकी दिली. या घटनेची माहीती बाजार समिती सभापती भारतीताई गावंडे व सचिव राजकुमार माळवे यांनी दिल्यानंतर सभापती व सचिव यांनी पोलीस स्टेशनला कायदेशीर तक्रार देण्यास सांगितले, अशी फिर्याद अकोट शहर पोलीस स्टेशनला सहसचिव विनोद कराळे यांनी दिली.
या तक्रारीवरुन अकोट शहर पोलिसांनी संजय गावंडे विरुद्ध भादंवि कलम ३५३, २९४, ३२३, ५०६ कलमान्वे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी १८ एप्रिल रोजी पोलीसांचा मोठा ताफा अंबिकानगरातील माजी आमदार संजय गावंडे यांच्या निवासस्थानी पोहचला, सशस्त्र पोलीसासह आलेल्या पथकाने घराला वेढा दिल्यागत परिस्थितीत गावंडे यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला अटक केली. न्यायालयात हजर केले असता, माजी आमदार संजय गावडे यांनी स्वतःच न्यायालयीन प्रक्रियेत भाग घेत खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगत जामीन घेण्यात नकार दिला.
दरम्यान या ठिकाणी जमा झालेल्या सहकार्यानी समजुत काढल्यानंतर वकील ठेवण्यात आले. पंरतु जामीन देण्याचे अधिकार अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयास असल्याने त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहीती अँड अविनाश अग्रवाल यांनी दिली. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या सह इतर पोलीस अधिकारी,राज्य राखीव दलाची तुकडी,पोलीस कर्मचारी असा बराच मोठा बंदोबस्त तैनात होता. न्यायालयाचे आदेशानुसार संजय गावंडे यांची अकोला जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयात सरकारी वकील म्हणून जयकुमार गावंडे, अँड आर.बी अग्रवाल, अँड अविनाश अग्रवाल यांनी काम पाहीले.