अतिवृष्टी, कोरोना आणि महागाईच्या भडक्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर, खाद्यतेल, कडधान्ये, रासायनिक खते, बांधकाम साहित्य अशा सार्याच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. बजेट कोलमडल्याने सर्वसामान्य नागरिकांपुढे अनेक प्रश्न उभे झाले आहेत. एकिकडे कोरानाचे संकट आणि दुसरीकडे महागाई. यामुळे अनेकांना कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना कसरत होत आहे.गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना संकट अद्यापही सुरूच आहे. परिणामी सर्वच क्षेत्राला याचा फटका बसतो आहे. अनेकांचे उद्योग, व्यवसाय बंद पडले. काहींना नोकरी गमवावी लागली. दरम्यान, जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय पूर्वपदावर येत होते. मात्र काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार पुन्हा ठप्प झाला आहे. परिणामी, गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. उदरनिर्वाह करताना अनेकांची तारेवरची कसरत होत आहे. वाढलेल्या महागाईविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
गॅसमध्ये 215 रुपयांची वाढ
जून ते नोव्हेंबर 2020 पर्यंत घरगुती सिलिंडरचा दर 597 रुपये होता. मात्र गेल्या काही दिवसांत एका सिलिंडरमागे थेट 215 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या 812 रुपये दराने सिलिंडरची विक्री होत आहे. तसेच एप्रिल 2020 महिन्यांपासून जिल्ह्यात घरगुती सिलिंडरचे अनुदान येणे बंद झाले आहे. अशातच दरवाढ झाल्याने ग्रॅस गाहकांतून संतापाची लाट उसळली आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दरात 15 रुपयांनी वाढ
काही दिवसांपासून पेट्रोल अणि डिझेलच्या किमतीत हळूहळू वाढ होत आहे. चार महिन्यांपूर्वी प्रती लिटर 81.12 रुपये असणारे पेट्रोल आज 96.85 रुपये झाले आहे. 120 दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात 15.73 रुपयांनी वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये प्रती लिटर 70.63 रुपये डिझेलचा दर होता. तो आज 86.53 रुपये झाला आहे. चार महिन्यात डिझेलच्या दरात 15.9 रुपयांची वाढ झाली आहे.
खाद्यतेलाच्या किमती भडकल्या
दैनंदिन स्वयंपाक आणि हॉटेलमध्ये खाद्यतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र तेलाच्या किमतीत लिटरमागे 40 ते 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. प्रती लिटर डिसेंबर 2020 मधील आणि कंसात सध्याचे दर असे ः पामतेल – 102 (125), सोयाबीन – 108 (145), सूर्यफूल – 120 (165), शेंगदाणे – 145 (175) तांदूळ आणि शाळूच्या दरातही 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कडधान्यांचा आलेख चढता…
काही दिवसांपासून कडधान्यांच्या दराचा आलेखही चढता आहे. प्रती किलो 95 रुपये किलो दराने विक्री होणारी तूरडाळ आणि मूगडाळ 120 रुपये दराने विक्री होत आहे. 90 रुपये किलो असणारा वाटाणा 140 रुपये झाला आहे. 80 रुपये असणारी मसूरडाळ 95 रुपये दराने विक्री होत आहे.
बेकरीच्या पदार्थांतही दरवाढ
बेकरी पदार्थ बनविण्यासाठी लागणारा मैदा आणि खाद्यतेल दरात वाढ झाली आहे. परिणामी, बेकरी पदार्थांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटाने अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. अशातच महागाईच्या भडक्याने आता जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा झाला आहे.
रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतर्यांवर पुन्हा संकट
गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी, कोरोनोचा सर्वाधिक आर्थिक फटका शेतकर्यांना बसला. यातून कसबसे सावरत उसनवारी, कर्ज काढून शेतकर्यांनी शेती पिकवली. मात्र सध्या रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकर्यांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळले आहे. डिसेंबर 2020 आणि कंसात सध्याचे पोत्याचे दर असे ः 10.26.26 – 1210 (1500), डीएपी-1225 (1700), 12.32.16 – 1220 (1600), 24.24.0 – 1220 (1350), सुपर फॉस्फेट – 380 (440), पोटॅश -850 (1000)
बांधकाम क्षेत्रालाही फटका
बांधकाम क्षेत्राशी निगडित वस्तूंचे दर वाढले आहेत. डिसेंबर 2020 मधील आणि सध्याचे दर असे ः सळी- 38 हजार प्रति टन ( 56 ते 60 हजार), वीट – 22 ते 24 हजार ट्रक ( 34 ते 36 हजार), सिमेंट – 270 ते 280 पोते ( 340 ते 370). फरशी आणि प्लम्बिंग वस्तू दरामध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रती ब्रास वाळूचे दर 13 हजार रुपयांवर स्थिर आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडित प्रत्येक वस्तूंचे दर वाढल्याने अनेकांनी बांधकाम बंद ठेवले आहे.