घरी सोडण्याच्या बहाण्याने एका तरुणीला बोरगाव डॅमजवळ नेऊन तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची तक्रार पीडित तरुणीने शुक्रवारी बडनेरा पोलिसात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पवन ऊर्फ सुयश राजेश भटकर (२० रा. शिवणी) याचेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
२० वर्षीय तरुणीची झिरी मंदिराजवळील पार्कमध्ये पवनशी मैत्री झाली होती. ती जुन्या बायपास मार्गावरील एका कंपनीत ड्रेस बनविण्याचे काम करीत होती. १६ मार्च रोजी तरुणी कंपनीतील काम आटोपून घरी जात असताना, तिला रस्त्यात पवन भटकर भेटला. त्याने तिला घरी सोडण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे संबधित तरुणी त्याच्या दुचाकीवर बसली. परंतु पवनने तरुणीला घरी सोडून न देता थेट काटआमला रोडवरील बोरगाव स्थित डॅमजवळ जबरदस्तीने नेले. तेथे डॅमच्या सिमेंट क्रॉक्रींटच्या जागेवर तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने तोंड दाबून अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगू नको, पोलिसांत तक्रार करू नको, नाही तर मी तुझी बदनामी करेन, अशी धमकी पवनने पीडित तरुणीला दिली होती. मात्र पीडितेने या घटनेची तक्रार १६ एप्रिल रोजी बडनेरा पोलिसात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पवनविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे.