मुंबई – राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचं चित्र आहे. कोरोनाबाधितांना बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांची हे इंजेक्शन मिळविण्यासाठी मोठी धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अन्न आणि प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यासंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी व औषध निरीक्षक अर्थात एरिया ड्रग इन्स्पेक्टर यांच्या मार्फत आता रेमॅडेव्हिव्हिर इंजेक्शन दिले असे जाहीर केले आहे.
गरजू व्यक्तींनी 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत माहिती घेवू शकतात. या नंबरवर संपर्क साधल्यावर तुमच्या भागातील एरिया ड्रग इन्स्पेक्टरचा नंबर शेअर केला जाईल. ही हेल्पलाइन अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करणारी ठरेल असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : घसा खराब आहे? त्यासाठी करा हे घरगुती उपाय
अन्न आणि प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, ‘ज्या रुग्णांना रेमडेसिवीरची गरज आहे, त्यांना पुरवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजणांनी रेमडेसिवीरचा वापर कसा करायचा हे सांगितले आहे. मात्र तरीही प्रोटोकॉलनुसार रेमडेसिवीरचा उपयोग केला जात नाही आहे. राज्यात अजून ३ ते ४ दिवस रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवेल.’
ते पुढे म्हणाले की, सरकारी रुग्णालयात रेमडीसीवीरची सुदैवाने कमतरता नाही. पण खाजगी रुग्णालयात तुटवडा जाणवत आहे. पुण्यात तुटवडा जाणवतोय तो दूर करण्यासाठी मी आयुक्तांना सूचना करेन. दुसरीकडे हाफकीनच्या माध्यमातून चांगलं काम होतआहे. 150 कोटी खर्च करुन या लसीला आपण सुरुवात करणार आहोत. प्राथमिक खर्चासाठी पुढील मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात येईल, असाही दुजोरा त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा : कोरोना स्पेशल “आमच्या विवाहाला या, पण कोरोना टेस्ट केली तरच…”
नुकतीच माझी काही कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशा प्रकारे त्या कंपन्यांच्या माध्यमातून ते वाढवून देतील? किती वाढवला जाणार आहे? साधारण तीन आठवड्यांपूर्वी याच कंपन्यांच्या सीईओ व एमडींसोबत मी बैठक घेतली. त्या वेळेस मला त्यांनी पुढील १५ तारखेपर्यंतचा अंदाज दिला होता. त्यानुसार रोज महाराष्ट्रात ५५ हजार रेमडेसिवीर पुरवतील, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. परंतु, कालच्या तारखेपर्यंत सरासरी जर आपण पाहिली, तर ३७ ते ३९ हजारांपर्यंतच त्यांनी रेमडेसिवीर पुरवले आहे.” असे डॉ.शिंगणे यांनी सांगितले.