अकोला – कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजता पासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजतापर्यंत ब्रेक द चैन अंतर्गत सुचना आणि निर्देश जारी केले आहे. त्याच अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला येथील कार्यालयामध्ये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये पुढील प्रमाणे कामकाज करण्यात येणार आहे.
नवीन वाहन नोंदणी- अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने व वाहन 4.0 प्रणालीवर ज्या वाहनाचे फिटनेस मोटार वाहन निरीक्षकाने ॲप्रुव्ह केलेले आहे. अशी प्रलंबित प्रकरणे सोडून नवीन वाहन नोंदणीचे कामकाज बंद राहणार आहे.
वाहन विषयक कामे- (वाहन हस्तांतरण, कर्ज बोजानोंद घेणे/कमी करणे)- वाहन 4.0 प्रणालीवर प्राप्त झालेली व नियमांची पुर्तता करीत असतील अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पुर्ण करण्यात येतील. नव्याने सदर कामकाजासाठी कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाही.
योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण- आवश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने सोडून इतर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज करण्यात येणार नाही.
परवाना विषयक कामकाज- वाहन 4.0 प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने प्राप्त होणारी सर्व परवानाविषयक कामकाज सुरु राहील.
शिकाऊ अनुज्ञप्ती/ पक्की अनुज्ञप्ती- कामकाज बंद राहील.
अनुज्ञप्ती विषयक इतर कामे- (दुय्यम अनुज्ञप्ती जारी करणे, नुतनीकरण इत्यादी)- सारथी 4.0 प्रणालीवर प्राप्त झालेली व पुर्तता करत असतील अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पुर्ण करण्यात येतील. नव्याने अर्ज स्विकारण्यात येणार नाही.
अंमलबजावणी विषयक कामकाज- अंमलबजावणी पथक रस्ता सुरक्षेशी निगडीत वाहनांची तपासणी करतील. वाहन अधिग्रहणाचे कामकाज प्राधान्याने करण्यात येईल. सार्वजनिक प्रवासी वाहनातून व खाजगी प्रवासी बसमधून होणारी प्रवाशांची वाहतूक ही राज्य शासनाने जारी केलेल्या ब्रेक द चैन अंतर्गत कोविड सुसंगत वर्तणूक निर्देश जारी केलेल्या सुचनेप्रमाणे होत असल्याची खातरजाम करण्यात येईल. सीमा तपासणी नाक्यावरील कामकाज नियमितपणे चालू राहील. जिल्हाधिकारी अकोला यांनी वेळोवेळी आदेशित केल्याप्रमाणे प्रवाशांची गर्दी करुन वाहतूक करणाऱ्या तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुध्द कार्यवाही करण्याचे काम करतील.
अभ्यांगतांना तसेच अर्जदारांच्या प्रतिनिधींना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात येत असून, अन्य कामकाजाकरीता कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता दरम्यान ॲन्टीजेन चाचणी करुन 48 तासापूर्वीचा RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय शासकीय कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही.
कार्यालयीन आवारात विनाकारण प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
शिकावू अनुज्ञप्ती/ पक्की अनुज्ञप्ती करीता पूर्व नियोजित वेळ घेतलेल्या सर्व अर्जदारांच्या अपॉईन्टमेंटसाठी कार्यालयामार्फत पुढील तारखांचे नियोजन करण्यात येईल. तरी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरीकांनी वरील नियमांचे पालन करुन सहकार्य करावे. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी डी.ए. हिरडे यांनी केले आहे.