बुलडाणा : बुलडाणा आगारातील महिला वाहक माधूरी मोरे हिच्या खुनाचे रहस्य पोलीस तपासात उलगडले आहे. या प्रकरणी जाफ्राबाद (जि.जालना) आगारातील वाहक अनिल भोसले (वय ३२) याला पोलीसांनी अटक केली आहे. एका तरूणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी पहाटे अंत्री खेडेकर गावाजवळ गळा चिरून खून केलेल्या अवस्थेत वाहक माधूरी मोरेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलीसांनी तपासाचे आव्हान स्वीकारत काही तासातच संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, सात वर्षापासून एस.टी. महामंडळाच्या सेवेत असलेली महिला वाहक माधूरी मोरे (वय २५) सेवेच्या सुरूवातीला जाफ्राबाद आगारात कार्यरत असतांना तेथील एक वाहक अनिल भोसलेशी तिचे सूत जुळले होते. दोघात काही कारणांवरून बिनसल्यानंतर माधूरीने बुलडाणा आगारात बदली करून घेतली होती. चिखली येथील अरूण काकडे याचेशी माधूरीची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. माधूरी व अरूण काकडे यांचेतील कथित प्रेमप्रकरणाची कुणकुण वाहक अनिल भोसलेला लागलद होती.
मयत माधूरी गुरूवारी १५ एप्रिलला ड्यूटी संपवून बुलडाणा येथून अंत्री खेडेकर गावी परतण्यासाठी मेरा फाटा येथे उतरली. तेथे आधीच तिच्या मागावर असलेल्या अनिल भोसलेने तुला घरी सोडून देतो असे म्हणून दुचाकीवर घेऊन गेला. यावेळी जाताना अरूण काकडे सोबत असलेल्या कथित प्रेमप्रकरणाचा विषय काढून त्याने माधुरीशी वाद घातला. या वादानंतर अनिलने मारहाण करून व चाकूने गळा कापून माधूरीचा खून केला. अंढेरा पोलिसांनी तपास करून अनिल भोसलेला गजाआड केले आहे. दुसरा युवक अरूण काकडेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.