मुंबई : गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला ज्यांना देण्यात आला आहे, ते घराबाहेर फिरत आहेत, त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होत आहे. अशा रुग्णांनी नियम पाळले नाहीत, तर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागेल आणि त्याचा खर्चदेखील त्यांनाच करावा लागेल”, असा सज्जड दम आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
राज्यातील आरोग्य संचालक, सहसंचालक, विभागीय उपसंचालक. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका अधिकारी यांच्यासोबत ऑनलाईन आढावा बैठक घेतली. तेव्हा ते बोलत होते.
हे पण वाचा : आता कोविड लस घेणाऱ्या ग्राहकांच्या ठेवीवर जादा व्याजदर
राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या घेऊन शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढवा, वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभी करा, पाॅझिटिव्ह रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणावर भर द्या, राज्यात आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा आरोग्य केंद्रांना दिले आहेत.
वातावरणातील ऑक्सिजन शोषून रुग्णांना देणाऱ्या तंंत्राचा वापर केला जात असून असे यंत्र जिल्ह्यात बसविण्यासाठी प्रयत्न करावेत. पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेऊन रेमडेसिवीरचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.