कंपाउंडर म्हणून काम करणाऱ्या भामट्याने डॉक्टर बनून अनेकांवर उपचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नगर रस्त्यावर शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तो लाेकांना तपासत होता. तसेच त्याने हॉस्पिटलजवळ असलेला गाळा भाड्याने देण्यासाठी एकाकडून ३० लाख रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्याने अनेक कोरोना रुग्णांवर उपचार केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी चंदन नारखेडे यांनी रांजणगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश किसन पाटील ऊर्फ मेहमूद फारुक शेख (रा. पीर बुऱ्हाणपूरनगर, जि. नांदेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पाटील याने नारखेडे याच्याकडून ३० लाख रुपये गाळा भाड्याने देण्यासाठी घेतले होते. त्यापैकी ६ लाख रुपये त्याने नारखेडे यांना परत दिले. मात्र, उर्वरित २४ लाख रुपये परत दिले नाही.
२२ बेडचे उभारले रुग्णालय
शेख हा १२ वी नापास असून नांदेड येथे एका डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून काम करत होता. उपचार पद्धती शिकून त्याने २ वर्षांपासून डॉ. महेश पाटील या बनावट नावाने शिरूर येथे मोरया रुग्णालय सुरू केले. २२ बेडच्या या रुग्णालयात त्याने कोरोना उपचारांसाठी स्वतंत्र कक्षसुद्धा सुरू केला. मेडिकल बिलाच्या नावाखाली तो रुग्णांच्या नातेवाइकांकडून हजारो रुपये उकळत होता. मात्र, भागीदारासोबत वाद झाल्याने प्रकरण पोलिसांत गेले.