अकोला : नागरिकांनी घराच्या बाहेर गरज असेल तरच पडावे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले आहे.
लक्षणे आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी व त्याचा प्रादुर्भाव होणार नाही याची जबाबदारी घेऊन संसर्ग टाळण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम तसेच भाजीपाला, किराणा दुकान, बँकांमध्ये गर्दी करू नये. दुकानदारांनी सुद्धा यासंदर्भात दक्षता घ्यावी, असे आवाहन ना. धोत्रे यांनी केले. अकोला शहरातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती दिवसेदिवस खराब होत आहे.
अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यातून रुग्ण येत असल्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी आहे. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलवर याचा फार ताण पडत आहे. प्रत्येकाने आपले धार्मिक उत्सव साजरे करताना गर्दी न करता व समाजात द्वेष निर्माण होईल असे कृत्य न करता आरोग्य विभागाच्या सूचनेचा तंतोतंत पालन करावे.
पोलिस प्रशासनाला तसेच जिल्हा प्रशासनाला मदत करावी. लसीकरणाच्या अभियानात सहभाग घ्यावा. रेल्वे सुद्धा मदतीला आली आहे. मुंबई, नाशिक, पुणे, भुसावळ, सोलापूर, नागपूर येथे रेल्वे कोचद्वारे कोविड सेंटर निर्मिती करण्यात आली आहे.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी या संदर्भात जनजागृती करावी. सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी समाजामध्ये या संदर्भात जनजागृती करून गर्दी होणार नाही याकडे लक्ष देण्याची विनंतही धोत्रे यांनी केली.