कोरोना आपल्या आयुष्यात आला आणि सगळं जगणंच बदलून गेलं आहे. एक वर्ष झालं. आपण या कोरोनारुपी विषाणूविरोधात युद्ध लढतोय. काही महिन्यांपूर्वी आपण हे युद्ध जिंकलचं, असा विश्वास आपल्याला आलं. मात्र त्याने पुन्हा एकदा जोरकसपणे हल्ला केलाय. मागील हल्ल्यापेक्षा तो कितीतरी पटीने मोठा आहे. हे आपण अनुभवतोच आहे. कारण पुन्हा एकादा लॉकडाऊन लागलं. त्यात सगळं बंद. करायचं काय? काही कंपन्यांनी, व्यापाऱ्यांनी, मोठ्या दुकानदारांनी तर थेट नोकरदारांना सुट्ट्या दिल्या. म्हणजे त्यांना असं करण्याशिवाय पर्यायचं नव्हता. पण, ज्यांना या सुट्ट्या मिळाल्या आहेत. ही लादलेली सुटी निश्चितच सुखावणारी नसते. कारण ही सक्तीची विश्रांती हजारो विचार घेवून येते. रिकामे मन सैतानाचे घर… ही म्हण का पडली, याचा अनुभव काही काळ रिकामे बसल्यानंतरच जाणवंत. भविष्यातील नाना चिंतांनी मन सैरभैर होतं. तेव्हा आपल्या लक्षात येतं की मन रिकामं असलं की पहिल्यांदा येतात ते नकारात्मक विचार. त्यामुळेच आता लॉकडाउन काळात हे विचारांवर कशी मात कारायची, या प्रश्नाचे उत्तर हे कोरोनाला हरविण्याइतकचं अवघड वाटू लागते.
एक नकारात्मक अनुभव-
”आवरली का कामं सगळी,” असं मी विचारल्यानंतर आमच्या शेजारच्या ताई आज सकाळी सकाळी सांगू लागल्या, ”आता काय काम आहे, दिवसभर तर घरीचं असणार. त्यामुळे निवांत सुरू आहे. त्या एका मोठ्या दागिने सराफ दुकानात नोकरीला आहेत. मी विचारलं, दुकानं वगैरे बंद आता. मग, कसं करणार कामाचं. त्या म्हणाल्या, जितके दिवस लॉकडाऊन, तितक्या दिवसांचा पगार कट होणार. आता प्रश्नही असा पडलाय की, १ तारखेला घराचं भाडं कसं भागवायचं. सकाळी सकाळी ही व्यथा कानावर पडली. त्यात त्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या. नवरा, त्या आणि एक लहान मुलगी. ताईंनी सांगितलेल्या गोष्टी विचार करायला भाग पाडणारी होती. ताईंचा नवरा म्हणे, लॉकडाऊन लागल्यापासून काहीचं बोलेना. शांत शांत आहे. व्यवस्थित जेवतही नाही. आत त्यांना अशी भीती वाटत आहे की, आपला नवरा नैराश्यात जातो की काय?
असेच असंख्य अनुभव अनेक जणांना येत असतील. खासकरून लॉकडाऊनच्या काळात लोकांना खूप काही समस्यांना सामोरं जावं लागतंय. आजारपणासाठी लागणारा पैसा, बँकेची घेतलेली कर्जे फेडण्यासाठी पैसा आणायचा कुठून? हातावरची पोटं असणाऱ्यांनी काय करायचं? दिवसभर राबराबल्यांनंतर ज्यांच्या घरात संध्याकाळी चूल पेटते, त्यांनी काय करायचं? काहींच्या अक्षरश: तर नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांनी आपलं पोट कसं भरायचं? अशा असंख्य प्रश्नांनी अनेकांच्या मनात घर केलंय. काय करावं, कुठे जावं, पुढे कसं होणार, काहीचं कळेना. परवा कुणीतरी म्हणालं, उदास उदास वाटतयं. नैराश्यही येतंय. मुलं-बाळं तोंडाकडे पाहतात म्हणून त्यांच्यासमोर काही बोलताही येत नाही आणि रडताही येत नाही.
मध्यंतरी लॉकडाऊन पुन्हा लागू झाल्यानंतर एका तरुण दुकानदाराने दुकानासाठी घेतलेले कर्ज कसं फेडायचं म्हणून आत्महत्या केली. जेव्हा पुढे काही मार्गचं उरत नाही, तेव्हा मानसिक हतबलतेतून टोकाचे पाऊल उचलले जाते.
नैराश्याची लक्षणे-
एका जागी बसून राहणे
अन्न, जेवण न जाणे
मन विचलित होणे
सतत मनात प्रश्न घोंगावत राहणे
एकाग्रता कमी होणे
नकारार्थी गोष्टींचा विचार करणे
किंवा असं झालं तर, तसं झालं तर अशा नाकारार्थी गोष्टी बोलून दाखवणे
झोप न येणे
या गोष्टी आपल्यावर परिणाम करणाऱ्या आहेत. या बाबी आपल्या मानसिक आरोग्यावर प्रभाव टाकणाऱ्या आहेत.
पण, लॉकडाऊन काळात खचून न जाता मन कणखर करणं खूपचं आवश्यक आहे. आजची स्थिती नक्कीच बदलेल. अशावेळी हातपाय गाळून चालणार नाही. असंख्य नकारात्मक गोष्टींना मनात आणि मेंदूत जागा न देता ते बाहेर फेकून द्यायला हवेत. निगेटिव्ह गोष्टी अजिबात मनात आणू नयेत. किंबहुना, त्या कमी कशा करता येतील, याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. नकारात्मक गोष्टींचं रुपांतर सकारात्मकमध्ये करण्यासाठी आपण काही गोष्टी करायच्या आहेत.
नकारात्मतेतून सकारात्मकतेकडे –
मानसिक तणावातून मुक्तता मिळवण्यासाठी मन एकाग्र होणं गरजेचं आहे.
मेडिटेशन करणं.
योगासने, सूर्यनमस्कार घालणे,
चालणे, व्यायाम करणे.
चांगले व ताजे अन्न, फलाहार घेणे.
खूप पाणी प्या.
कारण, मन आणि शरीर तंदुरुस्त राहायला हवं.
निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
घरात नकारार्थी गोष्टींवर चर्चा करू नये.
जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण सकारात्मक ठेवा.
आपल्या जवळचे, मित्र मंडळी, शिक्षक यांच्याकडून एखाद्या प्रश्नावर सल्ला घ्या.
जवळच्या व्यक्तीकडे मनमोकळे करा.
उदासीनता, निराश वाटू लागल्यास लगेच दुसऱ्या कामात व्यस्त राहा किंवा दुसऱ्यांच्या कामात मदत करा
आपले छंद जोपासा.
गाणी जरूर ऐका.
एखादे वाद्य वाजवता येत असेल त्यात सातत्य ठेवा.
मोकळ्या वेळेत पुस्तके वाचा , विनोदांच्या पुस्तकांचा समावेश असेल तरीही उत्तम.
आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वत: ला तयार करा.
आनंदी आणि फ्रेश राहण्याचा प्रयत्न करा.
चिडचिड करू नका, शांत राहण्याचा प्रयत्न करा.
चेहऱ्यावर हास्य आणा.
टीव्हीवर चित्रपट पाहा.
स्वयंपाकाची आवड असेल तर एखादा नवा पदार्थ तयार करण्यासाठी घ्या.
सद्य उद्भवलेली परिस्थिती नक्कीचं बदलेल, त्यामुळे घाबरून जाऊ नका.
फारचं त्रास होतं असेल आपल्या फॅमिली डॉक्टरशी बोलून घ्या.
कोरोनाविरोधातील महायुद्ध जिंकायचं असेल तर तेवढेच कणखर मनाने आणि जिद्दीने त्याचा मुकाबला करायला हवा. कोणतेही लढाई जिंकण्यासाठी शस्त्रांबरोबर मनही शस्त्रांएवढेच मजबूत अणि शक्तीशाली असावे. आपल्याच सर्वप्रथम मनच कणखर करायचं आहे.
या सर्व गोष्टींच्या ऊहापोहनंतर कवी कुसुमाग्रजांची एक कविता आठवली.
”मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा…”